नागपूर: माणसांवर केल्या जाणाऱ्या ‘फिजिओथेरेपी’चा प्रयोग अर्धांगवायू झालेल्या बिबट्यावर करुन ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अर्धांगवायूने चारही पाय जवळजवळ गमावलेला बिबट्या तब्बल दीड वर्षांच्या उपचारानंतर त्याच्या पायावर उभाच झाला नाही तर तो चक्क धावायलादेखील लागला आहे. कदाचित जगातील हा पहिला प्रयोग ठरला आणि तो यशस्वी देखील झाला.

वन्यप्राण्यांवरील उपचारासाठी आणि त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास परत मिळवून देण्यासाठी भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर नागपूर येथे तयार झाले. वनखात्याच्या अखत्यारितील या सेंटरने अतिशय कमी कालावधीतच भारतात आणि भारताच्या बाहेर आपली ओळख निर्माण केली आहे. बिबट्यावरील या यशस्वी प्रयोगाने याच ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कळमेश्वरजवळील निलगाव येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या बचाव पथकाने जखमी झालेल्या एका मादी बिबट्याला बेशुद्ध न करता जेरबंद केले. हे मादी बिबट जेरबंद केले तेव्हा तिचे चारही पाय काम करत नव्हते. वाहनाच्या धडकेमुळे तिच्या पायांची हालचाल बंद झाली होती. ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये आणताच येथील तज्ज्ञ पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी तिची क्ष-किरण तपासणी केली. या तपासणीत काहीच आढळले नाही. त्यामुळे आणखी काही तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

चारही पाय निकामी झाल्यामुळे बिबट्याला कड फेरण्यापासून तर खाऊ घालण्यापर्यंतचे सर्व काम ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या सहाय्यकांना करावे लागत होते आणि ते अतिशय कठीण होते. कित्येकदा त्या मादी बिबट्याला वैद्यकीय साहित्याच्या सहाय्याने अडकवून ठेवावे लागत होते. दरम्यान, याची माहिती शहरातीलच शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील ‘फिजिओथेरपी’ विभागाच्या एका महिला डॉक्टरला मिळाली. त्यांनी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या व्यवस्थापनाला त्या मादी बिबट्याला एकदा पाहू देण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी सेंटरमधील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने माणसांवर करण्यात येणाऱ्या ‘फिजिओथेरपी’चा प्रयोग या मादी बिबट्यावर केला.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह सेंटरमधील सहाय्यकांनाही त्यांनी हे तंत्र शिकवले. या प्रयोगाने सुरुवातीला त्या मादी बिबट्याच्या दोन पायात हालचाल निर्माण झाली. त्यानंतर समोरचा एक पाय देखील हालचाल करु लागला आणि त्यानंतर चारही पायावर मादी बिबट उभे झाले. अजिबात उठू न शकणारे ते मादी बिबट नऊ ते दहा महिन्याच्या उपचारानंतर धावायला लागले.