अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने एप्रिल महिन्यात आपल्या महसूलाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय वाढ केली. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल १४३.९३ कोटींचा महसूल प्राप्त केला. त्यामध्ये प्रवासी व मालवाहतुकीच्या महसुलाचा सर्वाधिक वाटा आहे. प्रवाशांच्या सुविधेत देखील वाढ केल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचा विविध मार्गाने उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच त्याला यश मिळाले. भुसावळ मंडळाने प्रवासी महसुलातून ७५.४१ कोटी, इतर महसूल १०.२९ कोटी, माल वाहतुकीतून ५६.५५ कोटी, विविध उत्पन्नातून ०१.६८ कोटी, तिकीट तपासणी मोहिमेद्वारे १०.९२ कोटींचा महसूल मिळवला.

सरासरी तक्रार निवारणात देशात भुसावळ प्रथम

भुसावळ विभागाने ‘रेल मदत’ प्रणाली अंतर्गत प्राप्त तक्रारींच्या निवारणात देखील उल्लेखनीय कामगिरी केली. सरासरी तक्रार निवारण वेळेत भारतीय रेल्वेमध्ये भुसावळ विभागाने पहिला क्रमांक प्राप्त केला. सरासरी प्रलंबित तक्रारींमध्ये सातवा क्रमांक प्राप्त झाला. बडनेरा रेल्वे स्थानकावर नवीन तिकीट नोंदणी कार्यालयाचे काम पूर्ण झाले. मूर्तिजापूर स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी तीन स्वच्छतागृह करण्यात आले. जळगाव स्थानकावर एस्कलेटरची सुविधा सुरू झाली.

या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान मुले, महिला आणि आजारी प्रवाशांना खूप मदत होईल. एप्रिलमध्ये जळगाव पार्सल कार्यालयातून १५४ ‘इंडेंटेड व्हीपी’ यशस्वीरित्या मिर्झा व संक्राईल गुड्स यार्डकडे पाठवण्यात आले. यामधून १.५८ कोटी रुपये प्राप्त झाले. हा नवा विक्रम झाला असून त्याने मे २०१९ मधील विक्रमाला मागे टाकले. भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर क्यूआर कोड ‘रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स’च्या माध्यमातून यूटीएस मोबाइल अ‍ॅपचा प्रचार करण्यात येत आहे.

तिकीट विक्रीत ५.२१ टक्क्यांनी वाढ

मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये तिकीट विक्रीत ५.२१ टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिल महिन्यात खंडवा स्थानकावरून पहिल्यांदाच सोयाबीन बियाण्यांची मालगाडी भरून ती जगित्याल रेल्वे स्थानकाकडे रवाना केली. भुसावळ विभाग रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुविधांसाठी विविध उपक्रम राबवते. रेल्वे सेवा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. रेल्वे प्रवाशांनी केवळ वैध आणि योग्य रेल्वे तिकीटांचा वापर करावा. प्रवासासाठी जास्तीत जास्त यूटीएस ॲपचा वापर करा. हे ॲप अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित असून प्रवाशांना चांगला अनुभव देते, अशी माहिती भुसावळ विभागाच्या रेल्वे प्रशासनाने दिली.