अकोला : अवैध सावकारी प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सहकार संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला. अवैध सावकाराच्या घराची झाडाझडती घेण्यात आली असून आक्षेपार्ह कागदपत्रे पथकाने जप्त केले आहेत. या प्रकरणात चौकशी केली जात आहे.
शहरात अवैधपणे व्याजाने पैसे वाटणाऱ्या सावकारांचा सुळसुळाट झाला. या प्रकारातून गरजूंची लूट होते. हे टाळण्यासाठी सहकार संस्था उपनिबंधक कार्यालयाकडून छापासत्र राबविण्यात येते. शहरात अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाल्यावर गोरखनाथ नथ्थूजी वानखडे (रा. पंचशील नगर, कृषी नगरजवळ, अकोला, ता. जि. अकोला) यांच्याविरुद्ध कारवाई करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये छापा टाकण्यात आला. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनात उपनिबंधक रोहिणी विटणकर यांनी पथक नियुक्त केले.
पथक प्रमुख दीपक सिरसाट, श्रध्दा देशमुख, अनिता भाकरे, दिनेश गोपनारायण, विनोद खंदारे, महेंद्र परतेकी यांनी गोरखनाथ वानखडे यांच्याकडे छापा टाकत झाडाझडती घेतली. या छाप्यामध्ये इसार पावती, इमला इसार पावती दोन, भरणा व ताबा पावती, भाडेपट्टा करारनामा, इमला विक्री व ताबा पावती, स्थावर खरेदी करारनामा, स्थावरचे खरेदी खत, नोंदवळी, चिठ्ठ्या, उसनवार पावती, आठ धनादेश आदी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. छाप्याची कारवाई पोलीस बंदोबस्त व पंचासमक्ष करण्यात आल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तींकडून व्याजावर कर्ज वाटप केले जात असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात १९९ अधिकृत सावकार
अकोला जिल्ह्यात अनुज्ञप्तीधारक सावकार संख्या १९९ आहे. यामध्ये अकोला ११३, बार्शीटाकळी १२, पातूर सात, बाळापूर २८, तेल्हारा पाच, अकोट १६ आणि मूर्तिजापूर येथील १८ सावकारांचा समावेश आहे.
६२ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्ह्यांची नोंद
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत अवैध सावकारी प्रकरणांमध्ये बळकावलेल्या एकूण १५१.६४ एकर शेतजमीन व ४७७६ चौ. फूट जागा, एक राहता फ्लॅट तसेच १६३.५० चौ. मी. जागा संबंधितांना परत करण्यात आलेली आहे. तसेच आजपर्यंत २१९ प्रकरणात कारवाई झाली. त्यापैकी ६२ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून १२२ प्रकरणात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम-१६ व १८(१) अन्वये चौकशी सुरू असल्याची माहिती उपनिबंधक सहकार संस्था कार्यालयाकडून देण्यात आली आहे.