अकोला : सहलीवर जाणे शिक्षकासह विद्यार्थ्याच्या जीवावर बेतले आहे. रायगड जिल्ह्यातील ‘काशीद बीच’ येथे अकोला शहरातील एका खासगी शिकवणी वर्गातील शिक्षक व विद्यार्थी सहलीसाठी गेले होते. त्यावेळी समुद्रात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. राम कुटे आणि आयुष रामटेके असे बुडून मृत्यू झालेल्या दोन जणांची नावे आहेत.
डिसेंबर महिना हा सहलीचा काळ. या महिन्यात शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणी वर्गाच्या सहली पर्यटनस्थळी जात असतात. याच प्रकारे अकोला शहरातील एका शिकवणी वर्गाचे १२ विद्यार्थी आणि तीन शिक्षक सहलीसाठी रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर गेले होते. त्यातील दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक असे तीन जण पाण्यात बुडाले. त्यापैकी एक विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थी सुखरूप आहे. राम कुटे (वय ६० वर्षे, रा. अकोला, शिक्षक), आयुष रामटेके (वय १९ वर्षे, रा. अकोला, विद्यार्थी) यांचा मृत्यू झाला. तिसरा बुडालेला आयुष बोबडे (वय १७ वर्षे, रा. अकोला ) हा विद्यार्थी सुखरूप आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली व मुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. शहरातील खासगी शिकवणी वर्गाचे विद्यार्थी आणि शिक्षक रायगड जिल्ह्यातील काशीद बीच परिसरात फिरत असताना शनिवारी सायंकाळी ते समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.
आयुष रामटेके हा शिकवणी क्लासेसचा विद्यार्थी नसून शिक्षकांच्या घराशेजारील राहणारा तरुण होता, असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. सहलीसाठी सोबत आलेले शिकवणी वर्गाचे केवळ तीन विद्यार्थी होते आणि तिन्ही सुखरूप असल्याचे शिकवणी वर्गाच्या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. ही घटना मुरुड पोलीस ठाण्यांतर्गत घडली. मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
समुद्रकिनारी जाताना विशेष काळजी घेण्याची गरज
समुद्रकिनारी जाताना सुरक्षेची, पर्यावरणाची आणि हवामानाची काळजी घेणे आवश्यक असते. समुद्रकिनारी सहलीला जाताना सुरक्षित किनाऱ्याची निवड करावी, गर्दीच्या आणि खडकाळ किनारे टाळावेत आणि भरती-ओहोटीची वेळ तपासावी. तसेच, समुद्रात उतरताना काळजी घ्यावी. हवामानाचा अंदाज घ्या आणि योग्य वेळेची निवड करा. खडकाळ किनाऱ्यावर सागरी पाण्याच्या खोलीचा अंदाज हमखास चुकतो. त्यामुळे सहलीसाठी असे किनारे टाळावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
