अकोला : आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरला जाण्याचे वारकऱ्यांना वेध लागले आहेत. अकोल्यावरून थेट पंढरपूरला जाण्यासाठी अकोला ते मिरज दरम्यान विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. यासोबतच एसटी महामंडळाने पंढरपूरसाठी १३१ बसचे नियोजन केले.
आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी जातात. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला!, विठ्ठल, विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा, हे आणि असे अनेक अभंग गात, माऊली-माऊलीचा गजर करत हजारो वारकरी आषाढ महिन्यात पंढरीची वारी करतात. अनेकांना पायदळ वारी करणे शक्य नसल्याने ते विविध वाहनातून पंढरपूर गाठतात. भाविकांना पंढरपूरला जाणे सोयीस्कर व्हावे, यासाठी रेल्वे व एसटी महामंडळाकडून नियोजन केले जाते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अकोला ते मिरज दरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी आषाढी विशेष गाडी चालविण्यात येणार आहेत.
गाडी क्र. ०७५०५ विशेष ०५ जुलै रोजी अकोला येथून ११.०० वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता मिरज येथे ही गाडी पोहोचणार आहे. गाडी क्र. ०७५०६ विशेष ०६ जुलै रोजी मिरज येथून १४.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १६.५० वाजता अकोला येथे पोहोचेल. या गाडीला वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, हरनगुल, विकाराबाद, तांदूर, सेरम, चीत्तपूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुरडुवाडी, पंढरपूर रेल्वे स्थानकांवर थांबा आहे.
एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान श्रेणी, नऊ सामान्य द्वितीय श्रेणी व दोन दुसऱ्या श्रेणीच्या सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स अशी गाडीचा रचना राहील. विशेष शुल्कासह चालणाऱ्या गाडीचे संगणकीकृत आरक्षण सुरू करण्यात आले आहे. अनारक्षित डब्यांचे तिकीट यूटीएस मोबाइल ॲप किंवा अनारक्षित तिकीट खिडकीवरून उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
पंढरपूर वारीला जाण्यासाठी अकोल्यावरून एसटी महामंडळाने देखील विशेष नियोजन केले. अकोला जिल्ह्यातील विविध आगारातून १३१ बसेस सोडण्यात येणार आहेत. अकोला १ मधून ३७, अकोला २ मधून ५१, अकोट २० , मूर्तिजापूर ९, तेल्हारा १४ बसेस आगारातून थेट पंढरपूरसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.