अकोला : कागदपत्रांसाठी थांबायला सांगितल्याच्या संतापातून दोघांनी मंडळ अधिकाऱ्यावर कटरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अकोट शहरात घडली. तलाठी कार्यालयाचे तोडफोड करून आरोपींनी शासकीय कामात देखील अडथळा आणला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे.

शासकीय कामकाज करीत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा शासकीय कामकाजात अडथळा आणून मारहाण होण्याचे प्रकार देखील घडतात. याच प्रकारची घटना गुरुवारी अकोट शहरात घडली.

गजानन नगर भागातील तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी गणेश भारती शासकीय कामकाज करीत होते. यावेळी सुनील अंबादास कतोरे व माधव नामदेव ताडे (दोघे रा. मोठे बारगन) हे दोघे कार्यालयात आले. त्यांनी भारती यांच्याकडे त्यांच्या प्रकरणातील निकालासाठी वापरलेल्या कागदपत्रांच्या प्रतींची मागणी केली. भारती यांनी थांबायला सांगून हातातील काम संपल्यावर प्रती देतो, असे म्हणाले. त्यावरून दोन्ही आरोपी संतापले. आरोपींनी शिवीगाळ करीत टेबलावरील लॅपटॉप व कागदपत्रांची फेकाफेक केली. शासकीय कामात अडथळा आणला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी भारती यांचे हात पकडले आणि गळ्यावर कटरने वार करून जखमी केले.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. जखमी गणेश भारती यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेचा विदर्भ पटवारी संघाच्यावतीने निषेध करण्यात आला.

पळून गेलेल्या मुलीचा लावला शोध

बार्शीटाकळी पोलीस ठाण्यामध्ये १७ वर्ष वयाची मुलगी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील पीडित मुलगी व आरोपी ओम प्रभाकर खेडकर रा. कळंबा बु हे शेगाव येथे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी तात्काळ शेगाव पोलिसांशी संपर्क केला. बार्शीटाकळी पोलिसांचे एक पथक शेगाव येथे रवाना केले. त्यानंतर पथकाने पीडित मुलगी व आरोपीस ताब्यात घेतले. त्या दोघांनाही बार्शीटाकळी येथे आणून मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत.