अमरावती : शहरातील अनेक तृतीयपंथीयांचे बळजबरीने मुस्लिमांमध्ये धर्मांतरण करण्यात येत असून पुन्हा हिंदू धर्मात परतणाऱ्यांना प्रचंड त्रास देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
धर्मांतरणामागे एक मोठे ‘रॅकेट’ सक्रीय असून तृतीयपंथीयांवर तलवारीने हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. पोलिसांनी हे ‘रॅकेट’ उध्वस्त करावे, अशी मागणीही डॉ. बोंडे यांनी केली.
डॉ. अनिल बोंडे म्हणाले, काही दिवसांपुर्वी शहरातील बजरंग टेकडी परिसरातील तृतीयपंथीयांच्या मंदिरावर मुस्लीम समुदायातील तृतीयपंथीयांच्या एका गटाने हल्ला केला. तलवारी, मिरची पावडरचा वापर या हल्ल्यात करण्यात आला. मात्र, भिक्षा मागण्याच्या कारणावरून हे भांडण झाल्याची नोंद पोलिसांनी केली.
पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला. पण, या हल्ल्यामागे एक मोठे कारण दडले आहे. तृतीयपंथीयांपैकी एक असलेल्या रेखाबाई यांना २०२३ मध्ये अचलपूर येथे मुस्लीम धर्मात प्रवेश घ्यायला लावण्यात आला. त्यांचे नाव देखील बदलण्यात आले. कागदपत्रांमध्ये त्याची नोंद देखील करण्यात आले.
मात्र रेखाबाई यांना मुस्लीम धर्मात रहायचे नव्हते. त्यांना पुन्हा हिंदू धर्मात परत यायचे होते. काही महिन्यांपुर्वी प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात रेखाबाई यांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. कुंभमेळ्यात रेखाबाई यांना महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. त्यावेळी त्यांना इतरही काही मुस्लीम धर्मांतरीत तृतीयपंथीय हे हिंदू धर्मात परत येण्यास इच्छूक असल्याचे समजले.
डॉ. अनिल बोंडे म्हणाले, अनेक तृतीयपंथीयांचे मुस्लीम धर्मांतरण करण्यात आले असून हा एक गंभीर प्रकार आहे. काही दिवसांपुर्वी तृतीयपंथीयांच्या एका गटाने हिंदू धर्मात परतलेल्या आणि इच्छूक असलेल्या तृतीयपंथीयांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला. धमक्या देण्यात आल्या. पण, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही.
तृतीयपंथीयांपैकी अनेक जण उच्चशिक्षित असून दुर्देवाने त्यांना तृतीयपंथीय म्हणून वेगळे आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. हिंदू तृतीयपंथीयांना मुस्लीम धर्मांतरीत करण्यासाठी मोठी टोळी कार्यरत असून पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे, असे डॉ. बोंडे म्हणाले.
यावेळी महामंडलेश्वर मांतगी नंदगिरी म्हणाल्या, कुंभमेळ्यात पुन्हा हिंदू धर्मात परतल्यानंतर आपल्याला धमक्या देण्यात आल्या. अजूनही त्रास देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ऑटोरिक्षातून आलेल्या आरोपींना आमच्या मंदिरावर दगडविटांचा मारा केला, तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलीसही त्यावेळी उपस्थित होते, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही.
