लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: यशोधरानगरातील गोमांस विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाई केल्यामुळे युनिट तीनचे पथक चर्चेत आले होते. मात्र, त्यांच्याच हद्दीत सुगंधित तंबाखू, अवैध सडकी सुपारी, धान्याचा काळाबाजार आणि गुटखा विक्री जोरात सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. त्यामुळे गुन्हे शाखेने लकडगंज हद्दीत सुगंधित तंबाखूच्या गोदामावर छापा घालून १८ लाखांचा तंबाखू जप्त केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज, तहसील, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू होते. त्या धंद्यांना तपास (डीबी) पथकातील कर्मचाऱ्यांचा ‘आशीर्वाद’ होता. त्यामुळे कोट्यावधींची उलाढाल सडकी सुपारी, गुटखा, तंबाखू, क्रिकेट बुकी-सट्टेबाज आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीतून होत होती. पोलीस मित्र टप्पू, श्याम, मुसळे, मोरे, नितीन यांनी अवैध धंदेवाल्यांशी साटेलोटे केल्यामुळे कुठेही कारवाई होत नव्हती.

गुटखा विक्रीबाबत लोकसत्ताने प्रकाशित केलेली बातमी

हेही वाचा… अकोला : शहरातील जनजीवन पूर्वपदावर; दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी; इंटरनेट सेवा सुरू

युनिट तीनने यशोधरानगरातील गोमांस विक्रेत्यांवर कारवाई करीत पोलीस आयुक्तांकडून पाठ थोपटून घेतली होती. मात्र, त्याच युनिटच्या ‘आशीर्वादा’ने अवैध धंदे सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ‘लोकसत्ता’ने ‘गोमांसवर कारवाई पण अन्य अवैध धंद्यांचे काय?’ असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करीत १८ लाख ५४ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. रूपेश अरुण नंदनवार (गोळीबार चौक, तहसील) आणि दत्तू बबनराव सराटकर (जुनी शुक्रवारी, कोतवाली) यांना ताब्यात घेतले. दुर्गेश अग्रवाल हा फरार झाला.

धान्य-सुपारी तस्करांना सूट?

लकडगंज, कोतवाली आणि तहसील पोलीस ठाण्याची हद्द म्हणजे अवैध धंदेवाल्याचे मुख्य केंद्र आहे. येथील धान्य तस्कर आणि अवैध सुपारी विक्री करणाऱ्यांनी गुन्हे शाखा आणि डीबी पथकाशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. सुगंधित तंबाखू्च्या गोदामावर कारवाई केल्यामुळे गुन्हे शाखेचे ‘भाव’ वाढले आहे. कारवाईपासून वाचवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी तस्करांच्या भेटी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aromatic tobacco worth 18 lakh seized in lakadganj adk 83 dvr