नागपूर : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन राज्यात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला केवळ १७ जागांवर थांबावे लागले. याचा विचार पक्षाच्या वरिष्ठांनी करण्याची गरज आहे. मी जाण्याने काँग्रेसला फरक पडला किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, मात्र पक्षात गटबाजी वाढली असल्यामुळे अनेकजण पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्याला मिळालेले नेतृत्व कोणालाही विश्वासात न घेता स्वत: निर्णय घेत असतात. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असताना महाविकास आघाडीमध्ये प्रादेशिक पक्षाला जास्त जागा दिल्या जातात. काँग्रेसला केवळ १७ जागा मिळतात. सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस नरमली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नेतृत्व किती कमजोर झाले हे लक्षात आले, अशी टीका त्यांनी केली. संजय निरुपम सारखा चांगला नेता काँग्रेसने गमावणे याचा विचार पक्षाने करायला पाहिजे. आम्ही त्यांना काढले असे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यामुळे पक्षातील अन्य नेते विचार करतात. काँग्रेसमध्ये गटबाजी वाढलेली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलो, असेही चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा – “अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”

राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहेत. त्यांच्या सभांना मोठी उपस्थिती असते. त्यांची रोखठोक शैली असून त्यांचा मोठा वर्ग आहे. त्यांनी महायुतीला समर्थन दिले आहे तर त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, असेही चव्हाण म्हणाले. निवडणुकीच्या काळामध्ये फार काळजीपूर्वक वक्तव्य करावे लागतात. मुनगंटीवार यांनी काय वक्तव्य केले ते मला माहीत नाही. मात्र, त्याबाबत तक्रार केली असेल तर निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेईल, असेही चव्हाण म्हणाले.

हेही वाचा – “महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

नांदेडमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी होईल. मी गेल्यानंतर चव्हाण नावाचा उमेदवार असला तरी चव्हाण- चव्हाण मध्ये फरक असतो. नाना पटोले यांच्या वाहनांच्या अपघातावरुन आरोप करणे हे केवळ राजकारण आहे. यातून प्रसिद्धी मिळावी हा प्रयत्न असू शकतो. जर काँग्रेसला घातपात म्हणायचे असेल तर त्याचा काही पुरावा आहे का, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.