चंद्रपूर : जिल्हा पुर्नवसन कार्यालय येथील सहायक महसुल अधिकारी नरेंद्र विठोबाजी खांडेकर यांना ३० हजार रूपये लाच रक्कम मागणी करून स्विकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रविवार २८ सप्टेंबर रोजी अटक केली.

तक्रारदार चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांच्या आईची मौजा चारगांव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील घर व खुली जागा औष्णीक विद्युत केंद्र चंद्रपूर येथे गेलेली असल्याने सदर मालमत्तेवर तक्रारदार यांचे मुलीचे नांव प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणुन नामनिर्देशीत केले होते. महाराष्ट्र राज्य वीज निर्मीती कंपनी मर्या, मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये तक्रारदार यांची मुलगी ही प्रकल्पग्रस्त या राखीव जागेतून ‘कनिष्ठ अभियंता’ या पदाकरीता निवड झालेली होती.

तकारदार यांचे मुलीचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पुर्नपडताळणी करण्याकरीता जुलै /२०२५ मध्ये जिल्हा पुर्नवसन कार्यालय चंद्रपूर येथे पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार तक्रारदार हे त्यांच्या मुलीसह प्रशासकीय भवन चंद्रपूर येथील जिल्हा पुर्नवसन कार्यालय येथे सहा. महसुल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना भेटले २ लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १ लाख रूपये व अहवाल तयार झाल्यानंतर ३० हजार रूपये पैशाची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी १ लाख रूपये जुलै /२०२५ मध्ये दिलेले होते.

दरम्यान खांडेकर यांनी तक्रारदार यांना २६ सप्टेंबर रोजी कार्यालयात बोलावून उर्वरीत ३० हजार घेवून या अन्यथा अहवाल पाठविणार नाही असे म्हणाले. परंतु तक्रारदार यांना आलोसे सहायक महसुल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार दिली.

प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक महसुल अधिकारी नरेंद्र खांडेकर यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी स्वतः करीता ३०,०००/-रूपये लाच रक्कमेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज रविवार २८ सप्टेंबर सापळा रचून खांडेकर यांना लाच स्वीकारताना अटक केली. सदरची कार्यवाही पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले व पथकाने केली.