यवतमाळ : कौटुंबिक विवंचनेने त्रस्त झालेल्या उच्चशिक्षित वयोवृद्धेची भटकंती अखेर थांबली. नंददीपने १७ ऑगस्टला तिला आपल्या निवारा केंद्रात आश्रय दिला. तिच्यावर दोन दिवस मानसोपचार चालले. भानावर आल्यानंतर तिचे १२ हजार ७०० रुपये परत करून तिला पुसद येथे रवाना करण्यात आले. नंददीपचे संदीप शिंदे, बी-काइंड पशुप्रेमी संस्थेचे प्रसाद वाजपेयी, खामगाव येथील धरमचंद सुराणा तसेच संजय बोरगावकर यांनी यासाठी पुढाकार घेतला.
कल्पना रोकडे (७०) रा.पुसद, असे या आजीबाईचे नाव आहे. काही दिवसांपासून ती शहराच्या वेगवेगळ्या भागात बसून राहायची. माईंदे चौकात ही म्हातारी एका ज्वेलरी दुकानाजवळ बसून होती. ही माहिती बी-काइंड पशुप्रेमी संघटनेचे वाजपेयी यांनी नंददीप फाउंडेशनचे मनोरुग्णसेवक संदीप शिंदे यांना कळविली आणि तिच्यावर पाळत ठेवली. तिला नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात आणण्यात आले. याठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांनी दोन दिवसांची औषधी तिला दिली. दरम्यान,आजीबाईची चिडचिड थांबली. तिने निवांत झोप घेतली आणि हळूहळू तिचे मन स्थिर झाले. आपली कौटुंबिक व्यथा तिने नंददीपच्या नंदिनी शिंदे यांच्यापुढे व्यक्त केली. त्यांनी तिच्या घराचा पत्ता जाणून घेतला. तिच्याजवळ आढळून आलेले १२ हजार ७०० रुपये तिला परत केले.
जाण्यापूर्वी तिने नंददीपविषयी आपला अभिप्राय लिहिला. तिचा हा व्हिडीओ समाजमाध्यमावर चांगलाच चर्चेत आहे. धरमचंद सुराणा यांनी तिला साडीचोळी देत काही रक्कमही दिली. इतकेच नव्हे तर स्वतः तिकिट काढून तिला एसटीत बसवून दिले. ही वयोवृद्ध महिला जुन्या काळातील एम.ए उत्तीर्ण आहे. ‘देव तुमचे भले करो, तुमचे कार्य असेच सुरु राहो’, असे आशीर्वाद देत तिने नंददीप येथून निरोप घेतला.
२५ वर्षानंतर त्याने आईला बघितले
बाळंतपणानंतर मानसिक आजाराच्या झटक्याने घरून बेपत्ता झालेली पार्वती २५ वर्षानंतर आपल्या घरी परतली, तेव्हा पहिल्यांदाच तिची मुलसोबत भेट झाली. मुलाने आईला पहिल्यांदाच पाहिले आणि तो गहिवरून गेला. येथील नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात एक वर्षाच्या मानसोपचारानंतर धारभा, जि.जमुई (बिहार) येथे कुटुंबीयांकडे पुनर्वसित करण्यात आलेल्या पार्वतीच्या कहाणीने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
स्किझोफ्रेनिया आजाराने बाधित पार्वती ही २९ जून २०२४ रोजी चंद्रपूर येथे अतिशय वाईट अवस्थेत सापडली होती. तिला येथील नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात उपचारासाठी आणले. दरम्यान पार्वतीने दिलेल्या माहितीवरून केंद्रातील स्वयंसेवक निशांत सायरे व इतरांनी बिहार राज्यातील वेगवेगळ्या १२ जिल्ह्यातील गावांची पाहणी केल्यानंतर धारभा हे तिचे मूळगाव जमुई या जिल्ह्यात असल्याचे समजले. प्रकृती सुधारल्यानंतर तिला धारभा या मूळगावी पाठविण्यात आले. तिचा मुलगा राजकुमार याने जन्मानंतर पहिल्यांदाच आपल्या आईला बघितले. आई-मुलाच्या भेटीचा हा क्षण बघताना उपस्थितही गहिवरून गेले.