नागपूर : कर्जमाफीसाठी दोन दिवस रस्त्यावर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवारी अचानक उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे रस्त्यावरचा मुक्काम रस्त्या लगतच्या मैदानावर हलवला. उंचसखल जमीन, काळोखात आंदोलकांनी उघड्यावर रात्र काढली. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज आंदोलनस्थळी येणार आहेत.
२८ ऑक्टोबरपासून राज्यभरातील शेतकऱ्यांनी नागपुरात येऊन नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडल्याने तेथील वाहतूक ठप्प पडली होती. सरकारने कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत आम्ही हटणार नाही,असा निर्धार शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केला होता. शेतकरीही सर्व तयारीनिशी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन पेटणार असे वाटत असतानाच सरकारकडून दोन राज्यमंत्र्यांना चर्चेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव आला. चार वाजताची वेळ ठरली, पण मंत्री या वेळेत चर्चेला आलेच नाही, पाच वाजताच्य सुमारास उच्च न्यायालयाने आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिले.
येथूनच आंदोलनाला वेगळे वळण लागले. सरकारचे हे कटकारस्थान आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे, याची दखल कोर्टाने स्वत:हून कधीका घेतली नाही असे अनेक प्रश्न आंदोलक संतापून व्यवस्थेला विचारू लागले. रस्त्यावरून उठून कारागृहात जाण्याची तयारी आंदोलकांनी सुरू केली. रात्री मंत्री आले, त्यांच्याशी चर्चेनंतर बच्चू कडू यांनी चक्काजाम आंदोलन स्थगित करून मुख्यमंत्र्यांच्या भेटीची तयारी दर्शवली. आंदोलक रस्त्यावरून उठून कापूस संशोधन केंद्राजवळच्या मोकळ्या जागेवर गेले.
मोकळी जागा ओली आहे. तेथे कुठलीही सुविधा नाही, काल रात्रभर पाऊस झाल्याने तेथे चिखल आहे. अशा अवस्थेत आंदोलकांनी तेथे रात्र काढली. मंत्र्यांच्या चर्चेच्या वेळी शेतकरी नेते अजित नवले यांनी प्रशासनाना फिरते स्वच्छता गृह, लाईट आणि पाण्याची सोय करण्याची विनंती केली होती. मात्र मोठ्या संख्येने शेतकरी तेथे आहेत, त्या तुलनेत सुविधांचा अभाव दिसून आला. आज सकाळी पाऊस झाला. त्यात अनेक आंदोलक पावसात चिंब भिजले. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज आंदोलनस्थळी येणार आहे. बच्चू कडूंना मुंबईत बोलवून आंदोलकांना पांगवण्याचा सरकारचा प्रयत्न यातून दिसून येतो अशी चर्चा आंदोलकांमध्ये आहे.
