अमरावती : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी निवडणुका पारदर्शक राहिलेल्या नाहीत, असा आरोप केला आहे.

बच्चू कडू म्हणाले, निवडणूक आयोगाच्या कामात पारदर्शकता राहिलेली नाही. अचलपूर विधानसभा मतदारसंघात १० हजार मतदारांची नावे वेळेवर कमी झाले आहेत. या सर्व घोळात निवडणुका घेणे म्हणजे अधिकच संभ्रम निर्माण करणारी बाब आहे. मतदानाचा सर्व नागरिकांना मुलभूत अधिकार आहे, पण माझे मत कुणाला पडले, हेही जाणून घेण्याचा प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे. निवडणूक आयोग ते मतदान दाखवू शकत नाही. माझे मत मला मिळाले, हे दाखवण्याची निवडणूक आयोगाकडे काय तरतूद आहे. ते निवडणूक आयोगाने सिद्ध करून दाखवावे, हे माझे निवडणूक आयोगाला आव्हान आहे.

बच्चू कडू म्हणाले, मतदाराचे मत कोणत्या उमेदवाराला गेले, हे जाणून घेण्याची व्यवस्थाच निवडणूक आयोगाच्या सध्याच्या पद्धतीत नाही. काँग्रेससह महाविकास आघाडीची मागणी ही मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी, ही असली, तरी माझे म्हणणे हे आहे की, ‘ईव्हीएम’ असू द्या, ‘व्हीव्हीपॅट’ मधून आम्हाला मतदान कुणाला दिले, हे दिसते. तो कागद नावासहित आमच्या हाती आला पाहिजे, त्यावर सही घेतली पाहिजे आणि ते मतपत्र मतपेटीत टाकता येऊ शकेल. म्हणजे ‘ईव्हीएम’ देखील राहील आणि आवश्यकता पडल्यास मतदान मोजता येऊ शकेल. यात मतपत्रिकेची गरज नाही.

बच्चू कडू म्हणाले, पुर्वीच्या मतपत्रिकेत नाव, मतदार क्रमांक, सही अशी व्यवस्था होती. आपले मतदान प्रत्यक्ष आपण पाहू शकत होतो. निवडणूक आयोगाने ही व्यवस्था संपवली. आता तुमचे मत हे हवेत आहे. तुमचे मत कुठल्या उमेदवाराला गेले, हे पाहण्याची व्यवस्थाच नाही. इथेच भाजप जिंकला आहे. हे एक कटकारस्थान आहे. दुसरीकडे, शहराच्या निवडणुका आधी घ्यायच्या, त्यात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून भाजप निवडून येणार आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल, आपल्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनुकूल वातावरण निर्माण कसे होईल, याची व्यवस्थित खेळी भाजपने रचलेली दिसते.

बच्चू कडू म्हणाले, निवडणूकांमध्ये कोणत्या पक्षासोबत युती करायची, याचा निर्णय अजून आम्ही घेतलेला नाही. यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत आम्ही आंदोलनातच होतो. निवडणुकीसाठी आम्हाला फिरता आले नाही. राजकारणात आम्ही तरबेज नाही, तरी निवडणूक काळात शेतकरी म्हणून सर्वांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.