अमरावती: सृजनशीलता ही अनेकाना हवी असते. त्यातून अनेक अविष्कार घडत असतात. अशा वैविध्यपूर्ण अविष्कारांची चर्चा समाज माध्यमांवर होत असते. कौशल्याचे प्रशिक्षण न घेणारेही काही सृजनशील लोक आपल्या अविष्काराच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. असाच एक अविष्कार एका ऑटो रिक्षा चालकाने केला आहे. साध्या ऑटो रिक्षाचे रूपांतर एखाद्या कार सारखा करण्याचा त्याचा प्रयत्न हा कौतुकाचा विषय ठरला आहे. समाज माध्यमांवर त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
बडनेरा येथील एका ऑटो चालकाने आपल्या साध्या तीनचाकी रिक्षाचे रूपांतर ‘लक्झरी ऑटो’ मध्ये केले आहे. या अप्रतिम मॉडिफिकेशनचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला असून, अनेक जणांना आश्चर्यचकित केले आहे.
कल्पकतेची भरारी
या चालकाने आपल्या ऑटो-रिक्षाला प्रगत आणि प्रीमियम कारमध्ये दिसणारी अनेक वैशिष्ट्ये जोडली आहेत. त्याच्या रिक्षात एअर कंडिशनिंग , पॉवर विंडोज, कन्व्हर्टिबल सीटिंग आणि आधुनिक इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. एवढेच नव्हे तर, प्रवाशांना सहज प्रवेश मिळावा यासाठी या ऑटोला दोन्ही बाजूंना दोन-दोन असे एकूण चार दरवाजे देण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याला कारसारखे रूप मिळाले आहे.
आरामदायक प्रवास आणि सोयीसुविधा
आतल्या बाजूला, मागील आसनाची रचना अशी केली आहे की ती दुमडून एका आरामदायक बेडमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना किंवा विश्रांतीसाठी हे वाहन अतिशय उपयुक्त ठरते. तसेच, ऑटोच्या मागे सामानासाठी प्रशस्त बूट कंपार्टमेंट आहे, जी सामान्य रिक्षांमध्ये सहसा पाहायला मिळत नाही.
नेटकऱ्यांकडून कौतुक आणि विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
इंस्टाग्रामवर एका युजरने सर्वप्रथम हा व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे या ऑटोला देशभरातून मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि प्रशंसा मिळाली.
“एलॉन मस्क, कृपया या जिनियसला भेटा!”, अशी गमतीदार प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली आहे.
“तुम्ही याला , ओयो रूम’ बनवण्याचा विचार करत आहात का?”, अशी विचारणा एका जणांनी केली आहे.
अनेक लोकांनी या कस्टम-मेड वाहनाची तुलना महिंद्रा थार , रेंज रोव्हर आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या लक्झरी गाड्यांशी केली आहे. एका युजरने म्हटले, “आतून पाहिल्यावर हे ऑटो असल्यासारखे वाटतच नाही,” तर दुसऱ्याने “थारपेक्षाही उत्तम” अशी प्रतिक्रिया दिली.
हा ऑटो चालकाचा अविष्कार व्यावहारिक उपयुक्तता आणि कल्पनाशक्तीचा एक सुंदर समन्वय असल्याची प्रतिक्रिया विविध माध्यमांमध्ये व्यक्त होत आहे.
