नागपूर : कळमना, पारडी पाठोपाठ बुधवारी वाडी पोलिसांनाही वडधामनात केलेल्या मोठ्या कारवाईत आणखी ४३५ पोती सडकी सुपारी पकडण्यात यश आले. तब्बल ६० लाखांची ही सडकी सुपारी चोरट्या मार्गाने इंडोनेशियातून आयात झाल्याची माहिती मिळत आहे. आयात शुल्क चुकवून आधी गुजरात आणि नंतर केरळ मार्गे ती सुपारी नागपुरात आली कशी, याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

बुधवारी सकाळी १० च्या सुमारास वाडी पोलीस हद्दीतल्या वडधामना येथे एका निळ्या रंगाचा भारत बेंझ ट्रकमधून सुपारीचे पोते दुसऱ्या ट्रकमध्ये भरले जात असल्याचा सुगावा पथकाला लागला होता. हायलँड वॉटर पार्कच्या रस्त्यावर हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी तडक घटनास्थळ गाठले. रस्त्याच्या आतील भागात एक मेकांच्या पाठीमागे लावलेल्या स्थितीत ट्रक मधील माल दुसऱ्या ट्रकमध्ये भरला जात असल्याचे पोलिसांना आढळले. यात ४३५ प्लास्टिक पोत्यांत तब्बल २९ हजार ९८३ कीलोग्रॅमची ६० लाखांची सुपारी पोलिसांनी जप्त केली.

ट्रक चालकाकडे कागदपत्रे मागितली असता त्याने गुजरात येथील अनास एंटरप्राईजेसचा असून तो केरळवरून नागपुरात आणल्याचे ट्रक चालकाने सांगितले. पारडी नागपूर येथील लक्ष्मी कोल्ड स्टोरेज येथे तो माल उतरवला जाणार होता. तत्पूर्वीच पोलिसांनी छापा टाकत हा माल ट्रकमधून दुसऱ्या ट्रकमध्ये भरला जात असताना पकडला. पोलिसांनी ट्रकसह संपूर्ण ४३५ पोती सुपारी ताब्यात घेतली. ही सुपारी सडकी आहे की आणखी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ती नागपुरात आली होती, याची शहनिशा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे किरण गेडाम यांच्या टीमने प्रत्येक पोत्यातील काही सुपारीचे नमुने गोळा केले. वाडीचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार प्रमोद गिरी, अजय पाटिल, राहुल बोटरे, रोशन फुकट, सोमेश्वर वर्धे, सतीश येसनकर यांनी ही कारवाई केली.

गुन्हे शाखेने गुरुवारी कळमना मार्केटमधील प्रिती इंडस्ट्रीज आणि धारगावच्या लक्ष्मी कोल्ड स्टोरेजवर छापा टाकत ४८ पोत्यांत २,४९८ किलो तर लक्ष्मी कोल्ड स्टोरेजमध्ये ५७ पोत्यांत ४ हजार किलो अशी १८ लाखांची सडकी सुपारी जप्त केली होती. त्यानंतर मंगळवारी सीएम कोल्ड स्टोरेजवर टाकलेल्या छाप्यात १५० पोती सुपारी पोलिसांना सापडली होती.