नागपूर: भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं असून बिहार विधानसभेत आता एनडीए आघाडीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बिहारच्या निकालानंतर देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून नेतेमंडळीही विजयावर प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनीही बिहार विजयावर आनंद व्यक्त केला. त्यानंतर,आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र या प्रतिक्रिया पेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या बिहारमधील भाषणाचा व्हिडिओ सर्वत्र बाहेर व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली होती. तेजस्वी यांच्या पराभवामुळे फडणवीस यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे.

काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी विषारी प्रचार चालवला होता-देवेंद्र फडणवीस

दुसरी एक बाब अशी आहे की काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवला आहे त्याला जनतेने उत्तर दिलं आहे. संवैधानिक संस्थांचा अपमान करणं. जनमताला विरोध दर्शवणं, जनतेला हे कळलं आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो त्या मतांचा अपमान राहुल गांधी करत आहेत. एकीकडे राजदची अवस्था वाईट झाली आहे. काँग्रेसची अवस्था आणखी वाईट आहे. काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी निकाल तिकडे आला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये अनेक प्रचार सभा केल्या यावेळी त्यांनी राहुल गांधींचा मतचोरीचा मुद्दा खोडून काढला तसेच तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी ”तेजस्वी के लालटेनमे तेल नही बिहार चलाना बच्चो का खेल नही” अशा शब्दात टीका केली. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा पराभव झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून बिहारच्या यशात त्यांचेही मोठे योगदान असल्यास बोलले जात आहे.