अमरावती : नामसाधर्म्यामुळे मुंबई पोलिसांना हवा असलेला आरोपी पकडण्याच्या प्रयत्नात अमरावती ग्रामीण आणि नागपूर गुन्हे शाखेच्या पथकांना बरीच धावपळ करावी लागली. अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहितीच्या आधारावर गुरूवारी रात्री परतवाडा येथील दोन ठिकाणी छापे टाकून १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, सखोल चौकशीअंती ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचा कुख्यात बिश्नोई टोळीशी कोणताही संबंध नसल्याचे आणि मूळ आरोपीशी केवळ ‘नामसाधर्म्य’ असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांना सोडून देण्यात आले.

गोपनीय माहितीने उडाली खळबळ

२ ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी मुंबई गुन्हे शाखेकडून अमरावती ग्रामीण पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. कुख्यात आंतरराज्यीय बिश्नोई टोळीशी संबंधित आणि मुंबई पोलिसांना हवा असलेला एक आरोपी त्याच्या काही साथीदारांसह परतवाडा येथे लपून असल्याची ती माहिती होती.

धोक्याची सूचना आणि संयुक्त कारवाई

माहिती मिळाल्यावर अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि नागपूर गुन्हे शाखेचे पथक तत्काळ परतवाडा येथे पोहोचले. दोन्ही पथकांनी समन्वय साधत आरोपीचे निश्चित ठिकाण शोधून काढले. आरोपी कुख्यात टोळीचा असून त्याच्याकडे अग्निशस्त्र असण्याची आणि पोलिसांच्या कारवाईला विरोध करण्याची, प्रसंगी गोळीबार करण्याची शक्यता असल्याची अत्यंत गंभीर सूचना वरिष्ठ स्तरावरून मिळाली होती.

दसरा सण आणि नागरिकांची सुरक्षा

शहरात दसरा असल्याने सर्वत्र नागरिकांची मोठी वर्दळ होती. अशा परिस्थितीत कारवाई करणे नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य नसल्याचे लक्षात घेऊन दोन्ही गुन्हे शाखांच्या पथकांनी सर्व सुरक्षा उपाययोजनांसह रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कारवाई सुरू केली. संशयित राहत असलेल्या घरात छापा टाकला असता, पोलिसांनी आवाज देऊन दार उघडण्यास सांगितले. मात्र, आत असलेले लोक घाबरून अंधाराचा फायदा घेत सैरावैरा पळू लागले. आरोपीच्या धोकादायक पार्श्वभूमीमुळे, स्वसंरक्षणार्थ आणि संशयितांना पकडण्याच्या उद्देशाने पोलिसांनी हवेत एक ‘वॉर्निंग शॉट’ (इशारा गोळीबार) फायर केला.

१३ संशयित ताब्यात, नामसाधर्म्याने झाला खुलासा

या कारवाईत पहिल्या ठिकाणाहून घरात असलेल्या ८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी त्यांचे इतर ५ साथीदार कश्यप पेट्रोल पंपाजवळ राहत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने दुसऱ्या ठिकाणीही छापा टाकून त्या ५ संशयितांनाही ताब्यात घेतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई गुन्हे शाखेचे पथक परतवाडा येथे दाखल झाले. सखोल चौकशीतून ताब्यात घेण्यात आलेल्या एकाही व्यक्तीचा कोणत्याही कुख्यात गँगशी संबंध नसल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.