लोकसत्ता टीम

वर्धा : विचारसरणीत मभिन्नता असली तरी निवडणुकीत उभा प्रत्येक उमेदवार हा समाजातील प्रत्येक घटकाकडे मतांची याचना करतोच. तेच आपल्या भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य समजल्या जाते. भाजपची विचारसरणी सर्वत्र परिचित आहे. पण धार्मिक सोहळ्यात हे नेते पण भिन्न विचारसरणीच्या लोकांमध्ये सहभागी होत असल्याचे पाहायला मिळते. तसेच इथे झाले.

कुरझडी येथे एका फार्म हाऊस मध्ये बुद्धिजीवी म्हटल्या जाणाऱ्या मुस्लिम व्यक्तींनी इफ्तार पार्टीचे आयोजन बुधवारी रात्री केले होते. त्यात भाजपचे उमेदवार रामदास तडस तसेच आमदार डॉ. पंकज भोयर यांनाही निमंत्रित करण्यात आले. ते हजरही झाले. त्यात एक निमंत्रक सुप्रसिद्ध वकील फिरदोस मिर्झा यांनी भूमिका मांडली. शकील सत्तार यांचे पण भाषण झाले.

आणखी वाचा- छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात…

आ. डॉ. पंकज भोयर म्हणाले की भाजपला मत देण्याचा विचार करावा. कारण हा पक्ष विकास कामांच्या आधारावर मते मागतो. मी स्वतः माझ्या मतदारसंघात मुस्लिम समाजाच्या अनेक कामांना मदत केली आहे. किंबहुना सर्वाधिक कामे केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उमेदवार असलेले रामदास तडस यांनी स्वतः केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. तसेच मत देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास काँग्रेसच्या अल्पसंख्यक सेलचे काही पदाधिकारी, मुस्लिम विचारवंत व अन्य सहभागी झाले होते.