दक्षिणमध्ये मतेंना उमेदवारी; यादीत पालकमंत्र्यांचे नाव नसल्याने आश्चर्य
भारतीय जनता पक्षाने आज मंगळवारी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात नागपुरातील पाच मतदारसंघात विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाल्याने त्यांच्या समर्थकात आनंदाचे तर दक्षिण नागपुरातील आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकात नाराजीचे सूर उमटले. येथे पक्षाचे माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव पहिल्या यादीत नसल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांना कामठी ऐवजी काटोल मधून निवडणूक लढवण्यास सांगण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
मंगळवारी दुपारी अपेक्षेप्रमाणे भाजपची यादी जाहीर झाली. त्यात नागपूर शहरातील सर्व म्हणजे सहाही मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. यात दक्षिण-पश्चिममधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व मधून विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, उत्तरमधून आ. डॉ. मिलिंद माने, मध्यमधून आ. विकास कुंभारे, पश्चिममधून विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. दक्षिणमध्ये मात्र पक्षाने विद्यमान आमदार कोहळे यांच्याऐवजी मोहन मते यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोहळे नाराज आहेत.
दक्षिण-पश्चिम व पूर्व नागपूर वगळता इतर चार मतदारसंघात यावेळी नवीन चेहरे दिले जातील, अशी चर्चा भाजप वर्तुळात होती. मात्र दक्षिण वगळता एकही नवीन चेहरा नाही. पश्चिमध्ये सुधाकर देशमुख यांना उमेदवारी मिळणार नाही असे भाजपचेच नेते सांगत होते. त्यांच्याविषयी नाराजी होती. असेच चित्र मध्य नागपुरातही होते. विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्याऐवजी पक्षाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना उमेदवारी मिळेल अशीही चर्चा होती. त्याचप्रमाणे उत्तर नागपुरातून लोकसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसपेक्षा कमी मते मिळाल्याने यावेळी तेथे नवीन चेहरा पक्ष देईल असे काही भाजप कार्यकर्ते सांगत होते. मात्र या सर्व ठिकाणी पक्षाने पुन्हा विद्यमान आमदारांना संधी दिली.
लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेली मते, पक्षाचे व खासगी संस्थेमार्फत केलेले सर्वेक्षण या आधारावर उमेदवारी देण्यात येणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र त्याचे प्रतिबिंब नागपूरच्या उमेदवारी यादीत दिसून येत नाही. २०१४च्या निवडणुकीत तिकीट वाटपात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वरचष्मा होता. याही वेळी दक्षिण वगळता त्यांचेच वर्चस्व यादीवर दिसून आले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या कामठी मतदारसंघातून यापूर्वी तीनवेळा निवडून गेले. तेथे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेलअसा विश्वास होता. मात्र त्यांचेच नाव पहिल्या यादीत नसल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. ते काटोल मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सावनेर या काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघातून भाजपने पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजीव पोद्दार यांना संधी दिली आहे. उमरेड आणि हिंगण्यातून विद्यमान आमदार अनुक्रमे सुधीर पारवे आणि समीर मेघे पुन्हा लढणार आहेत. रामटेक, कामठी आणि काटोल या ग्रामीणमधील तीन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आली नाही.
जिल्ह्य़ात आठ अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीसाठीजिल्ह्यतील १२ विधानसभा मतदारसंघातून मंगळवापर्यंत ६८० अर्जाची उचल झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याच्या चार दिवसानंतर ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये हिंगणा मतदारसंघातून २, उमरेड २, दक्षिण-पश्चिम, दक्षिण, मध्य आणि उत्तर नागपूर नागपूर मतदारसंघातून प्रत्येकी एक असे एकूण ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात हिंगणा मतदारसंघातून माधुरी विजेंद्र राजपूत, (सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट)),कॉ. माधव चंपतराव भोंडे, (अपक्ष), उमरेडमधून पांडुरंग शंभरकर, (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (एपीआय)) आणि विलास गणेश झोडापे (अपक्ष) यांचा समावेश आहे. शहरातील दक्षिण-पश्चिममधून योगेश ठाकरे, (सी.पी.आय.), दक्षिणमधून उदय बोरकर बहुजन महापार्टी यांनी, मध्यमधून प्रफु ल्ल हेमराज बोकडे, अपक्ष यांनी तर उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात कार्तिक गेंदलालजी डोके, विश्व हिंदू जनसत्ता पार्टी यांनी नामांकन अर्ज दाखल केला आहे.
माधुरी मडावी यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश
नागपूर : विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देणाऱ्या बहुचर्चित मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली असून त्यांनी ५ लाख ८६ हजार रुपये भरल्यानंतर राज्य सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर करावा, असे आदेश दिले आहेत.
मडावी यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी २७ जुलैला अमरावती विभागीय आयुक्तांकडे राजीनामा दिला. विभागीय आयुक्तांनी मंजुरीसाठी तो राज्य सरकारकडे पाठवला. ११ सप्टेंबरला नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी राजीनामा नामंजूर केला. त्याविरुद्ध मडावी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादासमोर (मॅट) अर्ज दाखल केला. मॅटने त्यांच्या अर्जावरील सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मडावी यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने राजीनामा नामंजूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती दिली होती. या याचिकेवर पुन्हा सुनावणी करून न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मिलिंद जाधव यांनी याचिकाकर्त्यांनी ५ लाख ८६ हजार रुपये राज्य सरकारकडे जमा करावे. त्यानंतर राज्य सरकारने त्यांचा राजीनामा मंजूर करावा, असे आदेश दिले. मडावी यांच्यावतीने अॅड. मोहन सुदामे यांनी बाजू मांडली.
मुख्यमंत्र्यासह अन्य भाजप उमेदवार उद्या अर्ज भरणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील अन्य मतदार संघातील उमेदवार गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामध्ये दक्षिण – पश्चिम नागपुरातून देवेंद्र फडणवीस, दक्षिण नागपुरातून मोहन मते, पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे, मध्य नागपुरातून विकास कुंभारे, पश्चिम नागपुरातून सुधाकर देशमुख आणि उत्तर नागपुरातून डॉ. मिलिंद माने यांचा समावेश आहे. ही सर्व मंडळी गुरुवारी सकाळी १० वाजता संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह गिरीश महाजन, आशीष शेलार आदी नेते उपस्थित राहणार आहेत.