बुलढाणा : तालुक्यातील देऊळघाट येथे कही दिवसांपूर्वी एका लग्नात झालेला वाद आज, गुरुवारी पुन्हा उफाळून आला. यामुळे झालेल्या तुंबळ हाणामारीत सहा युवक गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा रुग्णालय सूत्रांनी सांगितले. दोन गटात आज, १७ एप्रिलला हाणामारीची घटना घडली. यामध्ये दोन्ही गटातील ६ जण जखमी आहे. १४ एप्रिलला भोकरदन तालुक्यातील गोद्री येथे लग्नसमारंभ पार पडला. त्यावेळी वरातीमध्ये वऱ्हाडी नाचत असताना वाद झाला होता. उपस्थितांनी तो वाद मिटवला होता. मात्र, दोन गटांतील युवकांमधील धुसफूस कायम होती. आज ही धुसफूस व राग उफाळून आला. त्याच कारणावरून देऊळघाट येथील नंदू लवंगे यांच्या घरासमोर वादास सुरूवात झाली.
पुणे येथून एका कार्यक्रमावरून भाजपचे कार्यकर्ते नंदू लवंगे हे रात्री उशिरा घरी आले. ते झोपलेले असताना घरासमोर गोंधळ सुरू झाला. आवाज कशाचा आहे, हे बघण्यास गेले असता नंदू लवंगे यांनाही काही युवकांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या घटनेत नंदू लवंगे यांच्या उभ्या असलेल्या वाहनावरही हल्ला चढवत तोडफोड करण्यात आली. यानंतर देऊळघाट बसस्थानकावर ऋषीकेश सुसर नावाच्या युवकाला ८ ते १० जणांनी बेदम मारहाण केली. ऋषीकेश सुसर याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या गटातील रावसाहेब नारायण जाधव यांनाही मारहाण करण्यात आली आहे.
या दोन्ही गटातील वादामुळे देऊळघाट येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी झालेल्या हाणामारीत नंदू लवंगे, ऋषीकेश सुसर, गणेश सुसर, सोपान लवंगे, शिवाजी सुसर हे जखमी आहे. तसेच दुसऱ्या गटातील रावसाहेब नारायण जाधव हे जखमी आहे. जखमींवर बुलढाणा जिल्हा सामन्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी रूग्णालयात जावून संबधीतांचे जबाब नोंदवले आहे. देऊळघाटमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. चोख पोलीस बंदोबस्त लावला असून अतिरिक्त पोलीस दल देऊळघाटमध्ये तैनात करण्यात आले. संध्याकाळी सहा वाजतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.