अकोला : अकोला ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्षपदावर बदल करण्यात आला असून महानगर जिल्हाध्यक्षांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला. अकोला ग्रामीण भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा संतोष शिवरकर यांच्या खांद्यावर देण्यात आली, तर अकोला महानगराध्यक्षपदी जयंत मसने यांना कायम ठेवले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कुणबी व माळी समाजाची गठ्ठा मते लक्षात घेऊन जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे दिसून येते.
भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या मंगळवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांच्या स्वाक्षरीने प्रदेशस्तरावरून या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अकोला ग्रामीण व महानगर जिल्हाध्यक्षांचा देखील समावेश आहे. अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्षपदावर भाजप नेतृत्वाने बदल केला.
ग्रामीण जिल्हाध्यक्षपद किशोर मांगटे पाटील यांच्याकडे होते. आता भाजपने अकोट येथील संतोष शिवरकर यांच्याकडे अकोला जिल्हाध्यक्ष ग्रामीण पदाची धुरा सोपवली. त्यांचे वडील स्व.बाळासाहेब शिवरकर हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. अकोला महानगर जिल्हाध्यक्षपदी जयंत मसने यांना कायम ठेवले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर हे कुणबी समाजातून येतात, तर जयंत मसने हे माळी समाजाचे आहेत. या अगोदर भाजप जिल्हाध्यक्षपद हे पाटील समाजाकडे होते. कुणबी व माळी या दोन्ही समाजाची मोठी मतपेढी अकोला जिल्ह्यात आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा लाभ होण्यासाठी जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाने केला. आता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला मजबुती देऊन निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्याचे आव्हान नवनियुक्त जिल्हाध्यक्षांपुढे राहणार आहे.
वाशीम भाजप जिल्हाध्यक्षपदी पुरुषोत्तम चितलांगे
वाशीम भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी पुरुषोत्तम चितलांगे यांची नियुक्ती करण्यात आली. या अगोदर वाशीम भाजपचे जिल्हाध्यक्ष श्याम बडे होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात नाट्यमय घडामोडी होऊन वाशीम जिल्ह्यात कार्याध्यक्षाची नियुक्ती केली होती. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी पसरून गटबाजी सुरू झाली होती. याच वादातून काही पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचे काम न केल्याचा देखील आरोप झाला. या सर्व पार्श्वभूमीवर आता वाशीम भाजप जिल्हाध्यक्ष पदाची धुरा पुरुषोत्तम चितलांगे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.