चंद्रपूर : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तथा विविध उत्सव व सणांच्या धामधुमीत रेल्वेतील वाढत्या गर्दीचा बेकायदेशीर फायदा घेत वैयक्तिक ओळखपत्राने रेल्वे तिकीट आरक्षित करून काळाबाजार करणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चंद्रपूर, वणी व राजुर या तीन शहरांमध्ये छापे टाकून ६ जणांना अटक केली.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि सीआयबी अधिकाऱ्यांच्या १२ जणांच्या नागपूरस्थित पथकाने चंद्रपूर शहर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राजूर येथे एकत्रितपणे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी, राणा गौरांग हसमुखभाई रा.श्रीराम वॉर्ड, चंद्रपूर, पालोजित दादाजी दुधे रा.बालाजी वॉर्ड, चंद्रपूर, राहुल उत्तमकुमार स्वामी, रहिवासी बंगाली कॅम्प, चंद्रपूर, जब्बार अरुण चिनी, रा., यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी, वणी येथील साजिद सत्तार शेख आणि यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथील मोहम्मद खुशनूर हसमत अली, यांना अटक केली. सर्व आरोपींनी त्यांच्या दुकानातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्याचे रॅकेट चालवले होते. प्रत्येकाच्या दुकानांवर छापे टाकताना, पोलिसांनी संगणक जप्त केले आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रेल्वे ई-तिकिटांची पुष्टी केली.

हेही वाचा – चंद्रपूर : कन्हैयाकुमार, सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड यांची भाषणे रंगणार; बहुजन समता पर्व ११ एप्रिलपासून

हेही वाचा – नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात झळकतोय बेंबाळचा ललित; झाडीपट्टीचा गौरव

या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता रेल्वे पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सर्व आरोपींनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे वैयक्तिक आयडी वापरून ई-तिकीट तयार केले आणि मूळ किमतीच्या कितीतरी पटीने प्रवाशांना विकले, अशी तिकीट विक्री रेल्वेच्या नियमांनुसार बेकायदेशीर असल्याचे मानले जाते.