अकोला : पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रार प्रकरणातील चौकशी अहवाल सादर करण्यासाठी तब्बल २० हजाराची मागणी करून आठ हजारांची लाच स्वीकारताना वरिष्ठ महिला लिपिकाला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री रंगेहात पकडले. अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. लाचखोर वरिष्ठ महिला लिपिकाला तिच्या नातवासमोरच पथकाने रंगेहात पकडल्यामुळे आरोपीचे अश्रू अनावर झाले. ममता संजय पाटील (वय ५०, वरिष्ठ लिपिक, आस्थापना विभाग, अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय) असे लाचखोर लिपिक महिलेचे नाव आहे.

धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या तक्रारदाराची कैलास ओमप्रकाश अग्रवाल यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये गोदामातील धान्य विकून फसवणूक केली होती. याप्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यांनी आरोपी कैलास अग्रवाल यांना मदत केल्यामुळे त्यांना जामीन मिळाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

त्यावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल कार्यालयात पाठवला. त्या अहवालावर ‘नोटशीट’ तयार करून वरिष्ठांना सादर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक लाचखोर ममता पाटील यांनी २० आजारांची मागणी केली. १० हजार अगोदर व ‘नोटशीट’ सादर केल्यावर उर्वरित १० हजार द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केल्याची तक्रार अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. यावर ०६ नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. लाचखोर महिला लिपिकाने तडजोडीअंती आठ हजारांची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे त्यात निष्पन्न झाले. सापळा कारवाईमध्ये पंचासमक्ष लाच स्वीकारताना लिपिकाला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया खदान पोलीस ठाण्यात सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलीस हवालदार राहुल वंजारी, प्रमोद रायपुरे, पो.कॉ. शैलेश कडू, चालक पोउपनि सतीश किटुकले यांनी केली. पोलीस अधीक्षक कार्यालयातच लाचखोरी प्रकरणात सापळा कारवाई झाल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. लाचखोर महिला वरिष्ठ लिपिकाला तिच्या नातवापुढेच एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. आरोपी महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. या कारवाईची पोलीस वर्तुळासह जनमानसामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.