बुलढाणा : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गणरायाची श्रद्धापूर्वक उत्साहात स्थापना करण्यात आली आहे. तब्बल ३०७ गावांत राबविण्यात आलेला एक गाव एक गणपती हा आदर्श उपक्रम यंदाच्या गणेश उत्सवाचे वैशिट्य ठरले आहे. लाखो ग्रामीण नागरिकांनी भरभक्कम एकजूट यनिमित्त सिद्ध केली आहे. कथित चढाओढ आणि स्पर्धेतून गावांत दोन तीन वा लोकसंख्येनुसार या पेक्षा जास्त गणेश मंडळ सार्वजनिक गणरायाची स्थापना करतात. यामुळे वर्गणी पासून ते देखावे, कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणूक पर्यंत वाद निर्माण होतात. कधीकधी याचे पर्यवसन भांडण, हाणामारी मध्ये होते. प्रसंगी हा वाद पोलीस ठाण्या पर्यंत जातो. यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडते. डोके भडकून दंगली होतात.याचा ताण अपुऱ्या संख्येतील पोलीस कर्मचारी व पोलीस ठाण्यावर येतो. ही बाब लक्षात घेऊन प्रामुख्याने पोलीस विभागाच्या वतीने पुढाकार घेऊन एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविला जातो.
एकोप्याची परंपरा कायम
या उपक्रमाला मागील अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यात उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. यंदाचे वर्ष आणि गणेश उत्सव देखील अपवाद नाहीये. यंदा तब्बल ३०७ गावांत एकच गणपती बसविण्यात आला आहे. मतभेद विसरून गावाची एकता टिकवून ठेवणाऱ्या लाखो गावाकर्यामुळे हा उत्सव तंटामुक्त पद्धतीने साजरा होतॊ. अनेक गावांत तर पोलीस बंदोबस्ताची देखील गरज भासत नाही.
जिल्ह्यात तगडा बंदोबस्त
दरम्यान ३०७ गावे वगळता जिल्ह्यात मात्र तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा, श्रेणिक लोढा खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.
एसपी तांबे यांच्या नेतृत्वात
श्रीगणेश चतुर्थी २७ ऑगस्ट पासून ते श्रीगणेश विसर्जन ८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये २०० पोलीस अधिकारी, २५०० पोलीस अंमलदार , १३०० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाचे च्या ४ प्लाटून, ७ दंगा काबू पथक , १ शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहेत.
प्रतिबंधात्मक कारवाई
गणेशोत्सव निर्वाघ्न पार पडावा, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, या करीता भारतीय नागरीक सुरक्षा संहिता चे कलम १२६, कलम १२७, कलम १२९ अंतर्गत एकूण १०६९ ईसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता चे कलम १६२(२) प्रमाणे १४३५ ईसमांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे.
…तर ११२ वर संपर्क करा
दरम्यान पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना विविध सूचना दिल्या आहे. गणेश उत्सवांमध्ये विवीध मंडळांच्या देखाव्यांना भेटी देतांना, होणाऱ्या गर्दी दरम्यान लहान मुले, मौल्यवान वस्तु, मोबाईल फोन व्यवस्थीत सांभाळावे. गणेश मंडळांना भेटी देतांना आपल्या वाहनापासून रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. बंदोबस्तावरील पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.मंडळा समोर, मिरवणूकी दरम्यान लेझर लाईटचा उपयोग करु नये. रसायन मिश्रीत गुलालाचा उपयोग न करता फुलांचा वापर करावा, या ठिकाणी काही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती असल्यास या बाबतची बाबतची माहिती पोलीस विभागाचा टोल फ्री क्रमांक ११२ वर द्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.