बुलढाणा : महाराष्ट्राच्या विधी मंडळ समितीचा अभ्यास दौरा धुळे येथे होत असताना रोकड सापडली. ही घटना ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे काल पोलिसांच्या हातात मोठे घबाड लागले. दोन वेगवेगळ्या तक्रारीत पोलिसांनी तब्बल अडीच कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम मोजायला दीर्घ वेळ लागल्याने काल शुक्रवार, २३ मे रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मलकापूर शहर आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शुक्रवारी शहर पोलिसांना मलकापुर ते बुलढाणा मार्गावरून सिल्वर रंगाची आर्टिगा कारमध्ये दोन इसम मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.सदर माहीतीवरुन बोदवड नाका, वानखडे पेट्रोलपंपाजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी आलेल्या कार ( एमएच २० जिव्ही -१७८१) थांबवून गाडीतील दोघांना विचारपूस करण्यात आली. दोन्ही इसम छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. गाडी तपासली असता सदर गाडीमध्ये आसनाच्या खाली कप्यात मोठ्या प्रमणात रोख रक्कम असल्याचे दिसून आली. दोन्ही इसमास रक्कमबाबत विचारपूस केली असता त्यांनी रोख रक्कमबाबत समर्पक उत्तर दिले नाही. सदरचे ठिकाण हे वर्दळीचे व रहदारीचे आहे. त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडु नये म्हणून तात्काळ गाडी पोलीस स्टेशन मलकापुर शहरात आणण्यात आली. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार व त्यांचे मार्गदर्शनात मलकापूर तहसीलदार व नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मलकापुर तसेच महसुल विभाग मलकापुरचे दोन शासकीय पंच यांना पोलीस ठाण्यात पाचरण करण्यात आले. तसेच मोठ्या संख्येतील नोटा मोजण्यासाठी भारतीय स्टेट बँकचे कॅश मोजण्याचे मशिन, अधिकारी मागविण्यात आले. सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष गाडीतील रोख रकमेची व्हिडिओ शुटींगमध्ये मोजणी करण्यात आली.

सदर गाडीत मिळालेली एकुण रक्कम १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये असल्याचे आढळले. अधिका-यांच्या समक्ष पंचनामा कार्यवाही करण्यात आला. या खळबळजनक घटनेची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. जवळपास दोन कोटी रुपयांची ही जप्त रक्कम ‘आर्म गार्ड’सह जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यासाठी रवाना करण्यात आली.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, खामगावचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, सुधिर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पुढील चौकशी सुरु आहे. सदर कारवाईत ठाणेदार गणेश गिरी, ईश्वर वर्गे, श्याम सिरसाठ, श्याम कपले, शेख आसिफ,चरखे, मनोजकुमार उमाळे, योगेश तायडे, कैलास सोनोने, प्रविण गवई, सुरज चौधरी यांनी सहभाग घेतला.

फॉर्च्यूनरमधून ५० लाखांची रोकड जप्त

मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत धानोरा नजिक राष्ट्रीय महामार्ग ५३ वर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी फॉर्च्युनर गाडीतून ५० लाख रुपयांची रोकड व दोन जनांना ताब्यात घेतले.

मलकापूर राष्ट्रीय महामार्ग ५३ वरून फॉर्च्यूनर कार अवैधरित्या ५० लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जात असल्याची माहिती ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक संदिप काळे यांना मिळाली. यावरुन ठाणेदार यांनी पीएसआय राठोड यांच्यासह पथक पाठवून धानोरा राष्ट्रीय महामार्ग ५३ वर फॉर्च्युनर गाडी अडवून झडती घेतली. कारवाईत ५० लाख रोख , एक फॉर्च्यूनर गाडी जप्त केली. अलीम खान पठाण, राहणार बदनापूर जालना, श्रवण शंकरलाल देवासी,जालना, हल्ली मुक्काम राजस्थान यांना ताब्यात घेण्यात आले.