बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात शांततेत पार पडलेल्या दुर्गा व जगदंबा उत्सवाला अखेर काल रात्री गालबोट लागले! बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे घडलेल्या घटनेने या उत्सवाला गालबोट लागली.
बावनबीर येथील जगदंबा माता विसर्जन मिरवणुकीवर काल शनिवारी, चार ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दगडफेक करण्यात आली. अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत काही भाविक जखमी झाले. यावेळी दगडाचा मारा करण्यात आला. यामुळे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.
यापरिणामी मिरवणूकीत एकच गोंधळ उडून धावपळ उडाली. मिरवणूक बंदोबस्तावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची तारांबळ उडल्याचे दिसून आले.
यामुळे देवी उत्सव मंडळानी विसर्जन मिरवणुका आहे त्या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना पोलीस अटक करीत नाही तोपर्यंत विसर्जन मिरवणुका सुरु होणार नाही, असा निर्णय मंडळानी घेत मिरवणूक मार्गावर ठिय्या मांडला. हा ठिय्या आज रविवारी उत्तररात्री पर्यंत सुरु राहिला.
यामुळे घटनास्थळी व बावणबीर गावात गंभीर तणाव निर्माण झाला. याची माहिती तामगाव पोलीस ठाणे व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, ठिकठिकाणची अतिरिक्त पोलीस कुमक दाखल झाली.
बुलढाणा : बावनबीर येथील जगदंबा माता विसर्जन मिरवणूकीवर काल शनिवारी, चार ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दगडफेक करण्यात आली. अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत काही भाविक जखमी झाले. यावेळी दगडाचा मारा करण्यात आला. यामुळे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली.… pic.twitter.com/ftXMha51vZ
— LoksattaLive (@LoksattaLive) October 5, 2025
याची माहिती मिळताच जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी गावाला भेट दिली. त्यांनी समजूत घातल्यावर मंडळाचे संतप्त पदाधिकारी भाविक शांत झाले. आमदार व अधिकाऱ्यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यावर आज रविवारी, ५ ऑक्टोबरला पहाटे विसर्जन करण्यात आले. आज रविवारी सुद्धा गावात तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. गावात तणाव असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.