बुलढाणा : चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणारे किन्ही सवडद हे शांतताप्रिय आणि कुणाच्याही खिजगणतीत नसलेले गाव एका भीषण घटनेने हादरले! एका निष्ठुर पुत्राने आपल्या माता-पित्याची क्रूर पद्धतीने हत्या केल्याची ही घटना असल्याने गावात एकच खळबळ उडाली. जन्मदात्या माता-पित्याला देवाची उपमा दिली जाते. माता तर देवापेक्षा वरचढ, श्रेष्ठ समजली जाते. मात्र किन्ही सवडद गावातील मुलाने आपल्या वयोवृद्ध माता-पित्यावर पलंगाच्या लाकडी ठाव्याने वार केले. जाड लाकडाने त्याने इतके वार केले की ते दोघे वृद्ध घटनास्थळीच गतप्राण झाले.

गणेश महादेव चोपडे (वय अंदाजे ४५, राहणार किन्ही सवडद, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या क्रूर पुत्राचे (आरोपीचे) नाव आहे. कलावतीबाई महादेव चोपडे (वय ७० वर्षे, राहणार किन्ही सवडद) व वडील महादेव त्र्यंबक चोपडे (वय ७५ वर्षे, राहणार किन्ही सवडद) अशी भीषण अंत झालेल्या माता पित्याची नावे आहे.

घरात आईवडील एकटे असताना आरोपी गणेशने प्रथम आपल्या वडिलांवर हल्ला केला. खाटेच्या मजबूत लाकडी पायाचा वापर करून त्याने वडिलांच्या डोक्यावर आणि छातीवर अनेकदा वार केले नंतर आईला सुद्धा संपविले. चोपडे यांच्या घरातून ओरडण्याचे आवाज येताच शेजारी व गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. मात्र घरगुती भांडणाऐवजी अनपेक्षित धक्कादायक घटना घडल्याचे पाहून गावकरी थक्क झाले. संपूर्ण गावच हादरले. काही गावकऱ्यांनी या घटनेची माहिती अमडापूर पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळाल्यानंतर अमडापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली.

घरगुती वाद असल्याची चर्चा

ग्राम किन्ही सवडद हे अमडापूर तालुक्यातील एक शांत गाव आहे, जेथे बहुसंख्य लोक शेती-व्यवसायावर अवलंबून आहेत. चोपडे कुटुंब हे गावातील साधे-भोळे कुटुंब म्हणून ओळखले जाते. प्राथमिक तपासात घरगुती वाद हे हत्यांचे कारण असल्याचे समोर आले आहे. सततच्या भांडणांमुळे आरोपीच्या मनात राग साठला होता, असा संशय आहे. घटना घरगुती वादातून घडली असली तरी मूळ कारण जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपासात मूळ कारण उघड होईलच, पण या घटनेने तालुक्यातील ग्रामीण भागातील सामाजिक समस्यांना नव्याने हात घालण्याची वेळ आली आहे.