नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल कँसर इंस्टिट्युटसमोर एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला तर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला. कारचालकाने कार थांबवली आणि जखमीला रुग्णालयात नेतो असे सांगून त्याला कारमध्ये घेतले आणि जखमीला रूग्णालयात न नेता पोलिसांच्या भीतीने कार चिंचभवन पुलाखाली थांबवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारमधील जखमी युवकाला पुलाखाली फेकले आणि निघून गेला. दुचाकीचालकाने पोलिसांना अपघाताबाबत माहिती दिली. मात्र, जखमी युवक मेडिकल, मेयो यासह जवळपासच्या कोणत्याच रुग्णालयात दाखल नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी जखमी युवकासाठी शोधमोहिम राबविली. पहाटे साडेतीन वाजता चिंचभवन पुलाखाली त्या युवकाचा मृतदेह सापडला. त्या युवकाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिसांची रात्रभर दमछाक झाली. कृष्णा बुलसे (रा. अयोध्या नगर, हुडकेश्वर) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामावर मिस्त्री असलेले रुपेश वाळके आणि कृष्णा बुलके हे दोघेही गुमगाव येथे बांधकामाच्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते. सोमवारी सायंकाळी आठ वाजता ते दुचाकीने घराकडे परत जात होते. नॅशनल कँसर इंस्टिट्युटसमोरुन जात असताना मागून भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवर दोघेही खाली फेकले गेले. मात्र, दुचाकीच्या मागे बसलेला कृष्णा यांच्या डोक्याला जबर मार लागला.

दरम्यान, गॅसपाईपलाईनचे काम करणाऱ्या मजुरांनी गर्दी केली. त्यामुळे कारचालक पळून न जाता थांबला. त्याने जखमी कृष्णा याला ताबडतोब रुग्णालयात पोहचविण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे रुपेश आणि नागरिकांनी कोणताही वाद न घालता उपचारास प्राधान्य मिळावे म्हणून त्या कारचालकावर विश्वास ठेवून जखमीला कारमध्ये बसवले.

डोक्याला मार लागल्यामुळे कृष्णा मोठमोठ्याने ओरडत होता. दरम्यान, कारचालकाला पोलिसांच्या अटकेची आणि गुन्हा दाखल होण्याची भीती वाटायला लागली. त्यामुळे त्याने जखमी कृष्णा याला दवाखान्यात नेण्याऐवजी थेट चिंचभवन पुलाखाली फेकण्याचे नियोजन केले. त्याने चिंचभवन पुलाखाली कार थांबली आणि अंधारात जखमी कृष्णा याला पुलाच्या खाली फेकून पळ काढला. पहाटेपर्यंत उपचार न मिळाल्यामुळे कृष्णाचा अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला.

पोलिसांची शोधाशोध अन् जखमी सापडेना

रुपेश वाळके यांनी कृष्णाच्या पत्नीला माहिती दिली आणि पोलिसांनाही कळवले. बेलतरोडी, हुडकेश्वर आणि हिंगणा पोलीस घटनास्थळावर पोहचले. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. जखमी कृष्णाला कोणत्या रुग्णालयात दाखल केले, याचा शोध घेण्यात आला. मात्र, मेडिकल,मेयोसह जवळपासच्या एकाही हॉस्पिटलमध्ये कृष्णावर सुरु नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. पोलिसांनी शोधमोहिम राबवली. पहाटे साडेतीन वाजता चिंचभवन पुलाखाली कृष्णाचा मृतदेह सापडला. मात्र, कारचालक फरार झाला. हिंगणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन कारचालकाचा शोध घेणे सुरु केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car hit bike driver throw injured person under a bridge and running away after adk 83 zws