नागपूर : फिरणे कुणाला आवडत नाही? प्रत्येकाला कुठे ना कुठे जायची, त्या जागेबद्दल माहिती घेण्याची आवड असते. मग ही आवड जोपासत तुम्हाला त्यामध्येच करिअर करता आले तर? अनेकांना बारावीनंतर कुठल्या प्रकारचे शिक्षण घ्यावे, यामध्ये गोंधळ उडत असतो. त्यांच्यासमोर भरपूर पर्याय असतात खरे, मात्र कुठला पर्याय त्यांना खरंच उपयोगी पडू शकतो हे त्या वयात समजत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला जर फिरायची, भटकंती करायची आणि नवीन जागांबद्दल माहिती घ्यायची आवड असेल तर तुम्ही टुरिझम म्हणजेच पर्यटन क्षेत्राचा विचार करू शकता. या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी असून, ज्यांना परदेशात जायचे असेल त्यांनाही फायद्याचे ठरू शकते. यापेक्षा आता महत्त्वाची संधी देशातही मिळणार आहे. केंद्र सरकार देशात नवीन ५० पर्यटन क्षेत्रांचा विकास करणार आहे. यासाठी सरकारने काय तरतूद केली यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काय सांगितले ते बघुया…

अशी केली आहे तरतूद

अर्थसंकल्पामुळे देशातील मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. यासोबतच रोजगारवाढीवर मोठा भर देण्यात आला आहे. यासाठी देशातील ५० पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार असून खासगी क्षेत्राच्या मदतीने ते चालवले जाणार आहेत. याचाच भाग म्हणून अर्थसंकल्पात दिड लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटक उद्योजकांना ५० वर्षांचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार असल्याची माहिती, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. ‘ॲडव्हांटेज विदर्भ २०२५ : खासदार औद्योगिक महोत्सवा’साठी आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

गोयल पुढे म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या २०२५ च्या अर्थसंकल्पात नवीन कर व्यवस्थेअंतर्गत शून्य-कर उत्पन्न ७ लाखांवरून १२ लाखांपर्यंत वाढवला. यामुळे मध्यमवर्गाला मोठा फायदा होणार आहे. मध्यवर्गाची खर्च करण्याची ताकद वाढणार असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक पाठबळ मिळेल असा विश्वास गाेयल यांनी व्यक्त केला. रोजगाराच्या नवीन माध्यमांनाही अर्थसंकल्पामध्ये बळ देण्यात आले आहे. भारतात पर्यटन व्यवसायाला मोठी संधी आहे. त्यासाठी ५० नवीन पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. यासाठी खासगी उद्योजकांची मदत घेतली जाणार असून त्यांना ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल अशी माहिती गाेयल यांनी दिली.

१ लाख ६० हजार नवीन स्टार्टअपची नोंद

देशात स्टार्टअपला बळ देण्यात आले आहे. जानेवारी २०१६ मध्ये केवळ चार हजार स्टार्टअप होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे आता १ लाख ६० हजार नवीन स्टार्टअपची नोंदणी देशात झाली आहे. अर्थसंकल्पामध्ये संशोधनाला बळ देण्यात आले असून २० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government is going to develop 50 new tourism areas in country dag 87 sud 02