चंद्रपूर : जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांची भाजप आमदारांशी युती आणि भाजप उमेदवारांना उघड मदत केल्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. खनके हे देखील भाजप आमदाराचा आशीर्वाद असलेल्या पॅनेलचेच उमेदवार होते. ते भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांतील नेत्यांशी संबंध ठेवून आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नऊ संचालक विजयी झाले. त्यापाठोपाठ काँग्रेस, ठाकरे सेना व अपक्ष संचालक आहेत. मात्र, काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनी आपलेच संचालक अधिक निवडून आल्याचा दावा केला आहे. आमदार कीर्तीकुमार भांगडिया हे भाजपचे खरे ‘किंगमेकर’ ठरले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याऐवजी भाजप आमदारांशी घरोबा केला. परिणामी भाजपचे सर्वाधिक संचालक निवडून आले आणि काँग्रेस माघारली. काँग्रेसमधील काही संचालक तर केवळ भाजपचा दुपट्टा गळ्यात टाकून घेत बिनविरोध निवडून आले.

स्थानिक नेते उमेदवारी देत नाहीत म्हणून काँग्रेसचे पदाधिकारीही भाजप आमदाराच्या आशीर्वादाने पॅनेल तयार करून लढले. यात काँग्रेसचेच नुकसान झाले. यामुळे नाराज झालेल्या खनके यांनी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष तसेच सेवादल अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला.

विशेष म्हणजे, खनके यांनीही भाजप आमदाराच्या आशीर्वादाने बँकेची निवडणूक ओबीसी प्रवर्गातून लढवली. त्यांची थेट लढत काँग्रेसचेच माजी तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे व भाजपचे गजानन पाथोडे यांच्याशी झाली. खनके यांना २४२, थेरे यांना २९८, तर पाथोडे यांना ३०० मते मिळाली. ओबीसी प्रवर्गात खनके व थेरे हे काँग्रेसचेच दोन उमेदवार होते. यात थेरे यांना स्थानिक खासदारांचा, तर खनके यांना भाजप आमदाराचा आशीर्वाद मिळाला.
काँग्रेस नेत्यांनी दगाफटका केल्यानेच खनके यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र खनके यांनीही काँग्रेसशी दगाफटका केल्याची चर्चा आहे.