चंद्रपूर: जिल्ह्यातील १० नगर पालिका व १ नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, करण देवतळे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

या जिल्ह्यातील बल्लारपूर, मूल, राजुरा, गडचांदुर, ब्रम्हपुरी, चिमूर, नागभीड, वरोरा, भद्रावती, घुघूस या दहा नगर पालिका तथा भिसी या एका नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधित्व करणाऱ्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघात बल्लारपूर व मूल या दोन नगर पालिका आहेत. या दोन्ही पालिकेत यापूर्वी भाजपची सत्ता होती. मात्र साडेतीन वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने येथे आमदार मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. बल्लारपूर व मूल या दोन्ही शहरात काँग्रेस पक्ष काहीसा कमकुवत आहे. त्यामुळे येथे काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह काँग्रेस नेत्यांना भांडणं, मतभेद विसरून काम करावे लागणार आहे.

काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे ब्रम्हपुरी मतदार संघात ब्रम्हपुरी व नागभीड या दोन नगर पालिकेत वडेट्टीवार यांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. या दोन्ही पालिकेत काँग्रेसची सत्ता होती. मात्र आता बऱ्याच वर्षांनी पालिका निवडणूक होत असल्याने वडेट्टीवार यांना परिश्रम घ्यावे लागणार आहे. येथे भाजपचे माजी आमदार अतुल देशकर तथा समर्थकांवर जबाबदारी राहणार आहे. चिमूर नगर पालिका तथा भिसी नगर पंचायत येथे भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. येथे काँग्रेस पक्षाकडे माजी आमदार अविनाश वारजूकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर यांच्या शिवाय दुसरा चेहरा नाही.

त्यामुळे येथेही काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांना लक्ष द्यावे लागणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वरोरा या गृह मतदार संघात वरोरा व भद्रावती या दोन नगर पालिका येतात. वरोरा येथे काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असले तरी भद्रावती पालिकेत माजी नगराध्यक्ष तथा भासरे अनिल धानोरकर यांनीच आव्हान दिले आहे. भद्रावती येथे काँग्रेस कमजोर आहे. खासदार धानोरकर विरुद्ध सारे अशी येथे स्थिती आहे. त्यामुळे खासदार धानोरकर यांना परिश्रम घ्यावे लागेल. वरोरा येथे खासदार धानोरकर यांना भाऊ प्रवीण काकडे यांना दूर ठेऊन काम करावे लागेल. तेव्हाच त्यांना काही कमाल करता येईल. येथे भाजपचे आमदार करण देवतळे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे मुकेश जीवतोडे यांना यशासाठी चांगली मेहनत करावी लागेल. आमदार देवराव भोंगळे यांच्या राजुरा मतदार संघात राजुरा व गडचांदुर या दोन नगर पालिका निवडणुकीत त्यांचा कस लागणार आहे. येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांना ही परिश्रम घ्यावे लागेल. तर चंद्रपूर मतदार संघातील घुघुस नगर पालिकेत भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची खरी कसोटी आहे. घुघुस पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे कांग्रेस नेतेही सक्रिय झाले आहेत.