चंद्रपूर: परिवहन महामंडळाची चंद्रपूर आगाराची बस भादुर्ली येथून मूल येथे येत असताना रेल्वे रुळाच्या खालील बोगद्या तीन ते चार फूट पाण्यात अडकल्याची दुर्देवी घटना शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी घडली. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
दरम्यान शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. वरोरा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद घेतले गेली. वरोरा तालुक्यात १२० मी. मी पाऊस झाल्याने अनेक मार्ग बंद पडले असून शाळेतील १०० विद्यार्थी अडकून पडले होते. चंद्रपूर, मूल शहरात देखील मुसळधार पाऊस झाला. दरम्यान सर्व विद्यार्थी व नागरिकांना सुखरूप घरी पोहचविले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी अंदाजे वेळ सायंकाळी ६.१५ वाजता चंद्रपूर आगाराची बस क्रमांक (एम. एच. ४० एन ९४२६) ही भादुर्ली या गावातून मुल येथे येत असताना रेल्वे पटरी खालील बोगद्या मध्ये गाडी आली असता अंदाजे एक ते दोन फूट पाणी असल्याने बस निघू शकेल असे समजून बस चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला असता सायलेन्सर मध्ये पाणी गेल्यामुळे गाडी बंद पडली व पाऊस वाढल्यामुडे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने गाडीच्या रेडिएटर पर्यंत पाणी आले. त्यामुळे बस तिथेच अडकून पडली. सदर गाडीत तीन प्रवासी प्रवास करत होते. प्रवासी व चालक वाहक सुखरूप आहे. सदर घटना चालकाच्या निष्काळजी पणामुळे घडलेली आहे. घटनास्थळी आगार व्यवस्थापक, चंद्रपूर, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यंत्र अभियंता हे यांत्रिक कर्मचाऱ्यांसाह गाडी काढण्यासाठी पोहोचले आहेत.
दरम्यान शुक्रवारी वरोरा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वरोरा निमसडा मार्ग बंद झालेला आहे. निमसड्याचे ३२ शाळेचे विद्यार्थी व २५ ग्रामस्थ अडलेले असून त्यांची व्यवस्था वर्धा पावर कंपनीमध्ये करण्यात आली आहे. वरोरा तालुक्यातील भटाळा, खेमजई, वडगाव, नांद्रा, लोदीखेडा, येरखेडा आदी गावांतील शाळकरी विद्यार्थ्यांची बस शुक्रवार काल रात्री परतीच्या मार्गावर असताना नाल्याला आलेल्या पूरामुळे अडकली. वाहनचालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने धोका पत्करला नाही व नाल्यावरून बस नेण्याचा निर्णय न घेता पाणी ओसरल्यानंतरच प्रवास करण्याचे ठरवले.
दरम्यान स्थानिक आसाळा येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत ६० ते ७० मुला-मुलींसाठी जेवणाची व्यवस्था केली. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, तहसीलदार वरोरा योगेश कौटकर, मंडळ अधिकारी अजय निखाडे, तलाठी आसाळा रितेश आमटे, तलाठी टेमुर्डा सुनील राऊत, कोतवाल चांदेकर व शिपाई सचिन शेळकी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरा मुलींची राहण्याची व्यवस्था समाजभान आसाळा येथे तर मुलांची राहण्याची व्यवस्था टेमुर्डा येथील समाजभवनात करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस प्रशासनाने लेडी कॉन्स्टेबल्ससह शिपायांचे पथक घटनास्थळी पाठविले. अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास नाल्याचे पाणी ओसरल्याने आगार व्यवस्थापकांच्या सल्ल्यानुसार बस परत सोडण्यात आली.
विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी टप्प्याटप्प्याने सोडताना प्रत्येक गावात महसूल,ग्राम विकास,पोलीस प्रशासनाकडून जीपीएस फोटोग्राफ व व्हिडिओ घेण्यात आले, जेणेकरून विद्यार्थी योग्य ठिकाणी सुखरूप पोहोचले आहेत याची खात्री करता आली. या काटेकोर प्रक्रियेमुळे पालक व विद्यार्थ्यांच्या मनात समाधान व आनंद होता. या संपूर्ण प्रसंगात वाहनचालकांची दक्षता, स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य व प्रशासनाची तातडीची कार्यवाही यामुळे संभाव्य धोका टळला. यावेळी स्थानिकांनी विशेषतः ग्रामीण भागातील नाल्यांमध्ये अडकणारा केरकचरा व झाडेझुडपे नियमितपणे स्वच्छ करण्याची मागणी केली. प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाकडून येत्या काळात या बाबीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान वरोरा तालुक्यामध्ये सदर दिवशी काही मंडळात १२० मिमी तर काही मंडळात ६० मिमी इतका पर्जन्य नोंदविण्यात आला. या पावसाचा अंदाज एक दिवस आधीच घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास टाळण्याच्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी महोदय विनय गौडा साहेब , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार व जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती सोनावणे यांनी संयुक्तरीत्या निर्णय घेऊन वरोरा तालुक्यासाठी विशेष बाब म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय सर्व शाळांमार्फत पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण कार्यवाहीत स्थानिक खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार करण देवतळे यांच्या सूचना व मदतीने प्रशासनाने समन्वय साधून कार्य केले, त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका शक्य झाली.
बल्लारपूर शहरात वस्ती विभागातील गांधी चौकाच्या नजिक असलेला गुप्ता यांच्या घराचा रस्त्याकडील पूर्ण भाग कोसळला. थोडक्यात दोन मुली वाचल्या.ती घटना सीसीटीव्हीत दिसत आहे. मलब्याखाली दबलेली काही दुचाकी वाहने अग्निशमन दलाच्या पथकांनी काढले आहे.अजूनही काही दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत. या दुर्घटनेत कोणतीही वित्तहानी वा जिवीतहानी झालेली नाही. रस्ता बंद करून बॅरीगेटिंग करण्यात आले.त्या ठिकाणी १ सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले.त्या इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबांपैकी १ कुटुंब त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे थांबले असून १ कुटुंबाची राहण्याची व्यवस्था लोक मंगल कार्यालयात केली आहे.त्यांची जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून मलबा काढण्याबाबत सूचन देण्यात आल्या. सदर इमारत खूप जुनी असल्याने अगदी जीर्ण झालेली आहे.
इरई धरणाचे सर्व दरवाजे १ मीटरने उघडले
इरई धरणाची पातळी सात्यत्याने वाढत आहे त्यामुळे सर्व सात दरवाजे १.०० मीटर ने उघडले आहेत. सर्व संबंधित नागरिकांना सूचित करण्यात येते कि नदीपात्र ओलांडू नये. कोणत्याही पुलावरून पाणी जात असल्यास, पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. जनावरांना नदी काठी चरण्यास सोडू नये. आपल्या संपर्कात असलेल्या सर्वांना ही सूचना द्यावी. विशेष करून, पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.