नागपूर : चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘वनशक्ती’ कार्यशाळेत वनमंत्री गणेश नाईक यांनी ताडोबातील पर्यटन पंचतारांकित करण्यावर भर दिला. मात्र, त्यांनी वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ११ गावकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट देण्याचे सौजन्य दाखवले नाही. चंद्रपूरचे प्रतिनिधी देखील तोच कित्ता गिरवत असून मन-वन्यजीव संघर्षापेक्षा त्यांना जिल्ह्यातील व्याघ्रपर्यटन महत्वाचे झाले आहे. गावकऱ्यांना रोजगार या गोंडस नावाखाली त्यांनी “टायगर सफारी” चा घाट घातला आहे. त्यासाठी वनमंत्री देखील सरसावले आहेत.
चंद्रपूरमध्ये प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पला गती देण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या पर्यटनवाढीसाठी आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्टपणे मांडले. त्यांच्या सूचनांनुसार वनमंत्री गणेश नाईक यांनीही या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवत निधी वितरणाची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वनबल प्रमुख शोमिता बिस्वास, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व समन्वय अधिकारी नरेश झुरमुरे, वनविकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर बोडे, महाव्यवस्थापक (मुख्यालय) बेऊला माथी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक विवेक होसिंग तसेच महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डाचे सदस्य अरुण तिखे यांची उपस्थिती होती. चंद्रपूरच्या मूल रोडवरील वन अकादमीच्या मागील बाजूस १७१ हेक्टर क्षेत्रात टायगर सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी ५८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सदर प्रकल्पाचा आराखडा महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिनस्त एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेड यांच्याकडे तयार करण्यासाठी देण्यात आला आहे. या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साउथ अमेरिकन, साउथ आफ्रिका आणि इंडियन ट्रेल अश्या वेगवेगळ्या थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील. यामध्ये कांगारू, जग्वार, माकडे, कॅपीबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी अशा अनेक विदेशी व देशी प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. याशिवाय ४४ हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी आणि २० एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क व इतर पर्यटकांसाठी सुविधा विकसित केल्या.
या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबाच्या सफारीसाठी लाखो पर्यटक चंद्रपूरला येतात. मात्र अनेकदा वाघाचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही. नव्या टायगर सफारीमुळे पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होईल, तसेच विदेशी प्राणीही पाहायला मिळतील. त्यामुळे चंद्रपूरच्या पर्यटनात लक्षणीय वाढ होऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीत पुढील टप्प्याचे नियोजन आणि निधी वितरणाबाबत निर्णय घेण्यात आले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडने तयार केलेल्या आराखड्याची सखोल व तांत्रिक तपासणी करण्यात यावी, कोणतीही त्रुटी राहू नये, याची पूर्ण काळजी घ्यावी. प्रस्तावित ट्रेल्समध्ये स्थानिक जैवविविधतेचा विचार करून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे असे निर्देश दिले.