गडचिरोली : देशभरातून मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधानंतर ऑनलाईन जुगारावर सरकारने काही महिन्यांपूर्वी बंदी घातली. मात्र, या जुगाराच्या जाळ्यात अडकलेल्या कडून दिवसेंदिवस अनेक खुलासे होत आहे. असाच एक प्रकार लाखोंच्या फसवणुकीप्रकरणी तुरुंगात असलेल्या ‘सीए’च्या बाबतीत समोर आला आहे. ‘जंगली रमी’च्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या एका उच्चशिक्षित सीएने, आपल्याच अशिलाचे तब्बल ७१ लाख रुपये शासनाकडे जमा न करता त्यावर ‘डाव’ लावला. या गंभीर आर्थिक अपहार प्रकरणी अविनाश नरेंद्र भोयर या सीएला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश भोयर हा गडचिरोलीत सीए म्हणून प्रॅक्टिस करत होता. त्याच्याकडे शहरातील एका शासकीय कंत्राटदाराचे काम होते. त्यांच्या व्यवसायासंबंधित ‘जीएसटी’ भरण्याची जबाबदारी भोयरवर सोपवली होती. त्यासाठी वेळोवेळी त्यांनी भोयरकडे एकूण ७१ लाख रुपये जमा केले होते. मात्र, भोयरने ही रक्कम शासनाच्या तिजोरीत भरलीच नाही. त्याने संपूर्ण रक्कमेचा अपहार केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर कंत्राटदाराने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली आणि सीए अविनाश भोयरला अटक केली होती.
तपासात उघड झाला ‘ऑनलाइन’ जुगाराचा नाद
सुरुवातीला हा केवळ आर्थिक फसवणुकीचा साधा प्रकार वाटत होता. मात्र, भोयरला अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक वास्तव समोर आले. अत्यंत हुशार आणि बुद्धिमान मानला जाणारा हा सीए ‘जंगली रमी’ या ऑनलाइन जुगाराच्या पूर्णपणे आहारी गेला होता. पोलिसांनी भोयरचा मोबाईल आणि युपीआय तपसले असता, त्याच्या खात्यातून मोठी रक्कम ‘जंगली रमी’मध्ये खर्च झाल्याचे उघडकीस आले. तो या गेमवर अक्षरशः लाखो रुपये लावत होता. जिंकण्याच्या आशेने तो अधिकाधिक पैसे गुंतवत गेला आणि यात तो सतत हरत होता. स्वतःचे पैसे संपल्यानंतर, या व्यसनाने त्याला इतके आंधळे केले की, त्याची नजर अशिलाच्या जीएसटीसाठी आलेल्या ७१ लाखांच्या रक्कमेवर पडली. क्षणिक मोहापायी आणि हरलेले पैसे परत मिळवण्याच्या नादात त्याने हे पैसेही रमीवर उडवले.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, जो सीए लोकांच्या आर्थिक ताळेबंदाचे गणित सोडवतो, तोच या ऑनलाइन जुगाराच्या गणितात इतका फसला की, त्याने स्वतःचे करिअर, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पणाला लावली. अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या नादात उच्चशिक्षित तरुणही कसे भरकटू शकतात, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा कोणत्याही ऑनलाइन आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे
