नागपूर: तुमच्या मुलाची गोपनीय माहिती खासगी शिक्षण संस्थांना पुरवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्यायला हवी. काय आहे हा प्रकार? डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) जेईई आणि नीट परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती खासगी शिकवणीला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
‘बार्टी’तर्फे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या खासगी संस्थेकडे विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक आणि अन्य माहिती देण्यात आल्याची तक्रार आहे. यासंदर्भात नागपूर ‘बार्टी’ कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांना महासंचालक सुनील वारे यांनी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
‘बार्टी’च्या वतीने राज्यातील अनुसूचित जातीच्या इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘जेईई’ आणि ‘नीट’ या परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी बार्टीकडून खासगी शिकवणी देणाऱ्या संस्थांची निविदा प्रक्रियेद्वारे निवड केली जाते. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी विद्यार्थी संख्याही ठरवून दिली आहे. तसेच एका जिल्ह्यामध्ये चार ते पाच संस्था निवडण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य वाटणाऱ्या दर्जेदार संस्थेची प्रशिक्षणासाठी निवड करण्याची मुभा आहे. यामुळे आपल्याच संस्थेला सर्वाधिक विद्यार्थी मिळावेत म्हणून प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या संस्था विद्यार्थ्यांना संपर्क साधून विविध प्रलोभने देतात. असाच प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. पिरॅमिड ट्युटोरिअल्स या संस्थेने बार्टीच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबरला गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतली. यासाठी विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांना बोलावून प्रलोभने दिल्याचा आरोप मानव अधिकार संरक्षण मंचाने केला आहे. यासंदर्भात बार्टीकडे तक्रारही करण्यात आली. यानंतर महासंचालकांनी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आक्षेप का?
सामाईक परीक्षेच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ही बार्टीकडे असते. विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग निवडण्याचे स्वातंत्र्य असताना त्यांची गोपनीय माहिती बार्टीकडूनच खासगी शिकवणी वर्गाला देण्यात आली. यामुळे संस्था निवडीच्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यावरही गदा आल्याने आक्षेप घेतला जात आहे.
विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती अशाप्रकारे खासगी संस्थांना देणे गैर आहे. या प्रकरणात तक्रार झाली असून प्रधान सचिवांनी यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. – आशीष फुलझेले, मानव अधिकार संरक्षण मंच.
‘बार्टी’कडून आमच्या संस्थेची निवड झाली आहे. खासगी शिकवणी असल्याने आमच्याकडे शेकडो विद्यार्थी शिकवणीसाठी येतात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती चोरणे हे आमच्या तत्त्वात बसत नाही. आणि ते परवडण्यासारखेही नाही. याउलट सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यावरच आमचा भर असतो. यासंदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण आम्ही बार्टीला दिले आहे. – डॉ. जयंत गणवीर, व्यवस्थापकीय संचालक, पिरॅमिड ट्युटोरिअल्स.
या प्रकरणात झालेल्या तक्रारीनुसार सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सखोल माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. – सुनील वारे, महासंचालक, बार्टी.
