नागपूर: आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने (सीआयटीयू) २३ दिवसांचा संप यशस्वी केल्यावर गुरूदेव सेवाश्रम सभागृहात विजय मेळावा घेतला. याप्रसंगी विधानसभा अधिवेशनापूर्वी शासनाने आश्वासनानुसार शासन आदेश न काढल्यास पुन्हा संपाचा इशारा युनियनचे नेते राजेंद्र साठे यांनी दिला.

कार्यक्रमात राजेंद्र साठे म्हणाले, विधानसभा अधिवेशनापूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनाचा शासन आदेश काढायलाच हवा. जेणेकरून आशा वर्कर आणि इतरांना न्याय मिळेल. हा आदेश निघाला नाही तर पुन्हा संपावर जावे लागू शकते. संपामध्ये आशा वर्कर आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांची उपस्थिती चांगली होती. सगळ्यांच्या एकीमुळेच हे यश मिळाले.

हेही वाचा – यवतमाळ : चायनीज मांज्याने चिमुकल्याचा गळा चिरला, बंदी असतानाही सर्रास विक्री

हेही वाचा – प्रवाशांसाठी आनंदवार्ता; अमरावती-पुणे-अमरावती द्विसाप्‍ताहिक‍ विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ

याप्रसंगी सर्व उपस्थित आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. कार्यक्रमात वंदना पंडित यांनी क्रांतीकारी गित सादर केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आतषबाजी करून नृत्य केले. याप्रसंगी माया कावळे, आरती चांभारे, उज्वला कांबळे, नीलिमा कांबळे, गीता विश्वकर्मा, कनिजा शेख, मेहरूनिसा कनोजे, कोमेश्वरी गणवीर आदी उपस्थित होते.