गोंदिया:- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच विधानसभा निवडणुकीची चाहूल गोंदिया जिल्ह्यात लागली आणि महाविकास आघाडी आणि महायुती या सहाही पक्षांनी आपली रणनीती आखणे सुरू केले. या अंतर्गत गोंदिया विधानसभा या जिल्हाठिकाणी महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांनी गोंदिया विधानसभावर आपला आपला दावा केला आहे. यामुळे आता त्यांनी वाटलेल्या ९६-९६-९६ च्या वाटाघाटीत गोंदिया विधानसभेची ही जागा कोणत्या पक्षाच्या वाटेला येते हे मात्र येणारा काळच सांगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया विधानसभा २०१९ च्या निवडणूक निकालात येथे ऐन वेळेवर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांचा भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांनी पराभव करून ही जागा बळकावली होती. या अनुषंगाने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीकडे बघितल्यास आजघडीला महायुती आणि महाविकास आघाडीतील सहाही पक्षांनी आपला दावा गोंदिया विधानसभेवर केला आहे. याकरिता महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुरुवात करीत गोंदियातील माजी आमदार रमेश कुथे यांचे चिरंजीव सोनू कुथे यांना आपल्या पक्षात प्रवेशाची ऑफर दिली आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने ही जागा लढवण्याची चाहूल सुरू केलेली आहे. तसेच महाविकास आघाडीतील गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख (उबाठा) चे पंकज यादव यांनी पण गोंदिया विधानसभेवर आपण निवडणूक लढवणार याकरिता त्यांच्या पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव प्रयत्नशील असल्याचे पत्र परिषदेतून सांगितले आहे. तसेच आता नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे यांनी गोंदियाचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन गोंदिया विधानसभेवर आपला दावा महाविकास आघाडीच्या घटक पक्षातून पेश केला आहे. तसेच या संदर्भात महायुतीच्या विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात घेतलेल्या पत्र परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गट महायुतीमध्ये ९० जागा लढवणार असल्याचे सुतोवाच केले होते आणि त्या अंतर्गतच गोंदिया विधानसभा ही महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असे जाहीर केले होते.

हेही वाचा – नागपूर ‘एम्स’ला वारंवार जाहिरात देऊनही तज्ज्ञ डॉक्टर मिळत नाही! काय आहे कारण जाणून घ्या…

हेही वाचा – अमरावती : दोन चुलत बहिणींचा एकाचवेळी मृत्‍यू; अन्‍नातून विषबाधा…

एकंदरीत ही जागा महायुतीत भारतीय जनता पक्षाकडे आहे. मागच्या निवडणुकीत भाजपचे गोपालदास अग्रवाल हे पराभूत झाले होते त्यामुळे त्यांच्याही या निवडणुकीत दावा राहणारच आहे. नुकतेच गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख (शिंदे) गटाचे मुकेश शिवहरे यांनी पण आमचा पक्ष केव्हापर्यंत महायुतीतील इतर पक्षांना समर्थन करीत राहील असे म्हणत गोंदिया विधानसभा शिवसेना (शिंदे) गट लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा ही जागा वाटाघाटीत कोणत्या पक्षाकडे राहते हे नंतरच कळणार आहे. आजघडीला या जागेवर गोंदियातील विद्यमान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आपली तयारी आतापासूनच सुरू केलेली आहे. तर महाविकास आघाडी पक्ष आणि महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापली दावेदारी गोंदिया विधानसभेवर केली असल्यामुळे अत्याधिक चुरस निर्माण झालेली आहे. पण नेमकी ही जागा महाविकास आघाडी आणि महायुतीतून कोणाच्या वाट्याला जाते हे भविष्यकाळ सांगणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Claim of current independent mla and others on gondia legislative assembly sar 75 ssb