अमरावती : अचलपूर शहरातील गांधीपूल परिसरात बॅनर का फाडले, अशी विचारणा करीत एका १७ वर्षीय मुलाला लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करण्‍यात आली. त्‍यानंतर मुलाच्‍या काकाला देखील ८ ते १० जणांनी मारहाण केली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मुलाला पोलीस ठाण्‍यात आणत असताना काही समाजकंटकांनी पोलीस आणि जमावावर दगडफेक केली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेने संवेदनशील मानल्‍या जाणाऱ्या अचलपुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्‍या अचलपुरात पोलीस बंदोबस्‍त वाढविण्‍यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.

तक्रारकर्ता १७ वर्षीय मुलगा हा त्‍याच्‍या मित्रासोबत गांधी पुलावरून घरी जात असताना ८ ते १० जणांनी त्‍याला रोखले आणि शिवीगाळ करीत बॅनर का फाडले अशी विचारणा केली. त्‍याला लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण करून खिशातील मोबाईल आणि १५०० रुपये हिसकावून घेतले. त्‍यानंतर या मुलाचे काका पंकज केचे यांना देखील लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्‍यांच्‍या पायावर आणि पाठीवर मार लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहीत खान, अप्‍पू, बज्‍जू, हमीद ड्रायव्‍हर, जावेद, अन्‍वर, बाबा, अजीज, उस्‍मान बेग, हफीज खान (सर्व रा. रायपुरा, अचलपूर) यांच्‍यासह ८ ते १० जणांच्‍या विरोधात समरसपुरा पोलिसांनी गुन्‍हे दाखल केले आहेत.

हे ही वाचा…सुवर्णवार्ता… गणेशोत्सव संपताच सोन्याच्या दरात घसरण.. हे आहेत आजचे दर…

दरम्‍यान, पीडित मुलगा हा तक्रार नोंदविण्‍यासाठी जात असताना दोन गटांमध्‍ये हाणामारी सुरू झाली. काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्‍यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी समरसपुरा पोलिसांनी अज्‍जू, हमीद ड्रायव्‍हर, मोहीत खान, जावेद यांच्‍यासह २० ते २५ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवला आहे.
दगडफेकीची घटना घडल्‍यानंतर संतप्‍त जमावाने पोलीस ठाण्‍यात पोहचून आरोपींना तत्‍काळ अटक करण्‍याची मागणी केली. पहाटेपर्यंत अचलपुरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी जमावाला शांत करण्‍याचे प्रयत्‍न केले. ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तत्‍काळ अचलपुरात पोहचून परिस्थिती हाताळली.

हे ही वाचा…नागपूर : राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महाराष्ट्रात… बावनकुळेंचा इशारा

सध्‍या अचलपूर येथे शांतता असून आरोपींचा शोध घेण्‍यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. एका मुलाला मारहाण करण्‍यात आल्‍यानंतर दोन गटांमध्‍ये संघर्ष झाला. या प्रकरणात २० ते २५ आरोपी निष्‍पन्‍न झाले आहेत. त्‍यांना लवकरच शोधून अटक करण्‍यात येईल. गणेश विसर्जनादरम्‍यान ही घटना घडली असली, तरी लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन विशाल आनंद यांनी केले आहे.