वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे आमदार सुमित वानखेडे यांनी केलेले विधान व मुख्यमंत्र्यांनी केलेली त्याची पाठराखण ताजीच आहे. गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी समर्थकांचा शिरकाव होत असल्याने सावध राहण्याचा सल्लावजा ईशारा आमदार वानखेडे यांनी दिला होता. नागपुरात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या विधानाचे समर्थन पण केले होते. त्यामुळे गांधीवादी परिवारात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. निषेध आंदोलन झाले. दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय जन आंदोलन समितीने आरोप सिद्ध करा किंवा दिलगिरी व्यक्त करा, म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्रच पाठविले.

हा वाद प्रतिवाद ताजा असतांनाच भाजपने विदर्भस्तरीय पदाधिकारी बैठकीसाठी सेवाग्रामची निवड केली आहे. २८ जुलै रोजी सेवाग्राम येथील चरखा भवनात भाजपचे प्रदेश पदाधिकारी, विदर्भातील सर्व जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार, जिल्हाध्यक्ष, संघटन पदाधिकारी यांस उपस्थित राहतील. ही बैठक पूर्वी केळझर येथे घेण्याचे नियोजन होते. या ठिकाणी गणपती मंदिरात उपेंद्र कोठेकर यांच्या परिवाराने पूजा घातली आहे. पूजा व नंतर बैठक असे ठरत असतांना जागेची अडचण निर्माण झाली. तसेच पावसाचा मारा म्हणून मग चरखा भवन ठरले. या ठिकाणी ७०० प्रतिनिधीची व्यवस्था केल्या जात आहे. सकाळी ११ वाजता उदघाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संबोधित करणार. दुपारी ३ वाजता समारोप प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस हजर राहतील.

सेवाग्रामची निवड कां ? या प्रश्नावर संघटन सचिव डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणतात की विशेष काहीच कारण नाही. केळझर येथे ही विदर्भस्तरीय बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र पावसामुळे गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन वर्ध्यात घेण्याचे ठरले. भाजपची राज्य कार्यकारिणी व जिल्हाध्यक्ष यांची नवी टीम कार्यरत झाली आहे. तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्यावर चर्चा होईल. भाजपच्या अश्या विभागीय बैठका होत असतातच. त्याच स्वरूपातील ही बैठक विविध विषयावर चर्चा करणार.

दुसरीकडे गांधीवादी मंडळींचा सेवाग्राम हा केंद्रबिंदू असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमनाकडे ते कसे पाहतात, याकडे पण जनतेचे लक्ष लागले आहे. या विचाराच्या व शेती हा पिंड असलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची राजवट असतांना मोठमोठी आंदोलने केली आहेत. सध्या माओवादी समर्थकांचा शिरकाव झाल्याचा आरोप या मंडळींना डाचत आहे. म्हणून विदर्भ भाजप मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या अंगणात येण्याची बाब लक्षवेधी ठरत आहे.