नागपूर : लहानापासून मी ही इमारत पाहतो आहे. वेगवेगळ्या कारणाने कित्येकदा या इमारतीत मी आलो आहे. ही इमारत खुप जुनी होती आणि अलीकडच्या काळात मात्र इमारतीची अवस्था अतिशय वाईट झाली होती. त्यामुळे या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव जेव्हा आला, त्याचवेळी तातडीने त्याला मंजुरी देण्यात आली. मुळ इमारतीशी खुप जुना संबंध होता. या इमारतीशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहे. कधी काळी नाटकाच्या सरावासाठी मी या इमारतीत यायचो, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितली.
मुख्यमंत्र्यांनी इमारतीतील आठवणींना उजाळा देताना उपस्थितांनाही आश्चर्य वाटले. देवेंद्र फडणवीस यांनी कधीकाळी जाहिरातीसाठी केलेले मॉडेलिंग सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या मॉडेलिंगचे फलक नागपूर शहरातही लागले होते. मात्र, नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाटकातही काम करायचे, हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने साऱ्यांना माहिती झाले.
उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या ‘वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेल’च्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन १५ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला तसेच व्यासपीठावर एआयडब्ल्यूसीच्या माजी अध्यक्ष शीला काकडे, पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या अध्यक्ष नीलिमा शुक्ला, सचिव नीला कर्णिक उपस्थित होत्या. आपला समाज इतिहास विसरतो आणि तो विसरल्यामुळेच कधी काळी आपल्याला गुलामगिरीत जावे लागले. त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जातीयतेविरोधातील लढ्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या अनसूयाबाई यांनी महिलांच्या उत्थानासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी केलेले परिश्रम प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. देशाच्या पहिल्या संसदेत त्यांनी नागपूरचे प्रतिनिधित्व केले होते. महिलांच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यातील हक्काचा आवाज म्हणजे अनसूयाबाई होत्या. त्यांचे विचार, लेखन पुरोगामी होते. त्यात सुधारणवादाचा विचार होता.
आयुष्यात अनेकांच्या प्रेरणा ठरलेल्या अनसूयाबाई या आपल्या समाजाच्या आदर्श आहेत. नागपूर शहराने जी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे पाहिली, त्यापैकी अनसूयाबाई एक असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. रुस्तम केरावाला यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे यांनी प्रास्ताविकात अनसूया बाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन सरिता कौशिक यांनी केले. अनसूया काळे छाबरानी यांनी आभार मानले.
