अमरावती : आमदार यशोमती ठाकूर यांना गेल्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी ‘कडक नोटा’ दिल्‍या होत्‍या, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपुर्वी केला होता. त्‍याचे पडसाद अजूनही उमटतच आहेत.  त्‍यांच्‍या वक्तव्याची चौकशी करून खासदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी कॉंग्रेसच्‍यसा अनुसूचित जाती विभागाचे  जिल्हा अध्यक्ष प्रवीण मनोहर यांच्या नेतृत्वात मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्‍यामार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार नवनीत राणा यांनी दहीहंडीच्‍या कार्यक्रमात बोलत असताना २०१९ च्‍या निवडणुकीत आमदार यशोमती ठाकूर यांना ‘कडक नोटा’ दिल्याचे वक्तव्य केले होते. यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. प्रवीण मनोहर म्‍हणाले, नवनीत राणा यांच्या आरोपानंतर आमदार यशोमती ठाकूर यांना त्‍यावर रोखठोक प्रत्‍युत्‍तरही दिले, पण जिल्ह्यात राणा दाम्पत्याच्या या कृती मुळे संताप व्यक्त होत आहे. खासदार राणा यांच्या  या आरोपामुळे काही प्रश्न निर्माण होत आहे की, नवनीत राणा यांनी आरोप केलेल्या ‘कडक नोटा’ किती होत्या? राणा यांनी त्या आमदार यशोमती ठाकूर यांना कशा साठी दिले?

हेही वाचा >>> झोपेत असलेल्या चिमुकलीच्या अंगावर पडला साप अन्…

या ‘कडक नोटां’चा  उल्लेख त्यांच्या निवडणूक हिशेबात केला का? जर उल्लेख केलेला नसेल, तर ही निवडणूक आयोगाची शुध्द फसवणूक आहे. नवनीत राणा यांच्या २०१९ च्‍या निवडणूक खर्चाच्‍या हिशेबाची कसून चौकशी व्हावी आणि राणा यांनी फसवणूक केल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करावी, असे प्रवीण मनोहर यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. निवेदन सादर करताना अनुसूचित जाती विभागाचे शैलेश दूपारे, सुकुमार खंडारे, अमोल गुडधे, डॉ. धम्मा गुडधे, अजय तुपसुंदरे, डॉ.शंकर ठाकरे, विलास गायकवाड, राजू कुरहेकर, कैलाश कठाने, अंकुश खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint of mp navneet rana to chief election commission in the note case mma 73 ysh