नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

काँग्रेस आघाडीच्या काळात नेत्यांनी स्वत:च्या संस्थांचा विकास केला. मात्र, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर आम्ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व आरोग्य संस्थांची निर्मिती केली. येणाऱ्या दिवसांत शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू. आता नागपूर बदलत असून याचे श्रेय मुख्यमंत्री किंवा माझे नाही तर ते जनतेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे पश्चिम नागपूरचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ रामनगरात आयोजित प्रचार सभेत गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला राजेश बागडी, भूषण शिंगणे, संजय बंगाले, रूपा राय आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, पश्चिम नागपुरात गेल्या पाच वर्षांत अनेक प्रकल्प राबवण्यात आले. मोठय़ा प्रमाणात सिमेंट रस्त्यांची कामे करण्यात आली. केवळ रस्ते आणि मेट्रोच नाही तर विदर्भातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी मिहानमध्ये अनेक उद्योग सुरू करण्यात आले. शहरात आज सीएनजीवर बसेस धावत असून येणाऱ्या काळात महापालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची वाहने आणि शहरातील सर्व ४०० बसेस सीएनजीवर धावतील. भारतात हा पहिला प्रकल्प होईल. सिमेंट रस्ते, २४  तास पाणी नागरिकांना मिळत आहे. नागपूर ही देशातील पहिली महापालिका अशी आहे जिने अनेक प्रकल्प राबवून ते यशस्वी केले आहेत.  सौरऊर्जेवर चालमारी मेट्रो, सिम्बॉयसिस नागपुरात आले. १७०० कोटींचा रिंग रोड बांधला जात आहे. ८००कोटी रुपये खर्च करून नवीन मल्टी मॉडेलचे काम सुरू आहे. ३५० मैदाने तयार केली जात आहेत. अंबाझरी व तेलंगखेडी उद्यानाचा विकास केला जात आहे.

अन् स्मृती इराणींऐवजी गडकरी आले

रामनगर येथील सभेला केंद्रीय मंत्री व अभिनेत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार होत्या. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मतदारसंघातील अनेकांनी गर्दी केली होती. मात्र, त्यांचा नागपूर दौरा रद्द झाल्याने सभेला आलेल्या अनेकांची निराशा झाली. स्मृती इराणी येणार नसल्याचे कळताच अनेकजण माघारी परतले. अखेर ऐनवेळेवर नितीन गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली.