विधान परिषद निवडणूक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात भाजपने आपले मतदार सुरक्षितस्थळी हलवले तर प्रतिस्पर्धी काँग्रेस आवश्यक मतदारांची जुळवाजुळव प्रक्रियेत अद्याप तरी विस्कळीत असल्याचे दिसत आहे.

भाजप आपले नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना गोव्याला घेऊन गेली आहे. तर काँग्रेसने मतदार असलेले नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांशी संपर्क साधण्यासाठी यंत्रणा विकसित केलेली नाही. त्यामुळे एकीकडे मत फुटू नये म्हणून भाजपने घेतलेली काळजी आणि दुसरीकडे मतदरांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अजूनही काँग्रेसकडून हालचालींना वेग आलेला नाही. याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 या निवडणुकीत विजयी होण्यासाठी हवे असलेले मतदारांचे संख्याबळ भाजपकडे  आहे. काँग्रेसला विजयासाठी ६० हून मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. अशा स्थितीत काँग्रेसने अधिक प्रयत्न असणे अपेक्षित होते. परंतु भाजपने अधिक सक्रियता दाखवून आपल्या मतदारांना आधी सुरक्षितस्थळी हलवले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कातंत्राचा वापर करून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकाला फोडून काँग्रेसची उमेदवारी दिली. आता त्याचा विजय सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेस आणि पटोले काय करतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसकडून ‘अडवान्स’ घेतला आहे. तसेच ते काँग्रेसच्या संपर्कात आहे, असा दावा काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने केला आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. निवडणूक डावपेचांची जाहीर वाच्यता केली जात नाही.

रवींद्र भोयर, काँग्रेसचे उमेदवार.

भाजपचे चार नगरसेवक परतले

भाजपचे बुटीबोरी नगरपंचायतचे नगरसेवक गोव्याहून परत आले आहेत. मतदारसंघातून फोन येत असून लोकांची कामे होत नसल्याचे कारण सांगून ते बुटीबोरीला परतल्याची माहिती आहे. तसेच अनेक नगरसेवक शरीराने गोव्यात आहेत, पण नागपूरच्या त्यांच्या मित्रांच्या कायम संपर्कात असल्याचे एका नगरसेवकाचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress electorate still disarray ysh
First published on: 03-12-2021 at 00:22 IST