गडचिरोली : “ज्या विचारधारेच्या लोकांनी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास दिला, तीच ‘आम्हीच मोठे, बाकी सगळे कनिष्ठ’ ही भाजपची विचारधारा आजही कायम आहे,” अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेते व गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या पक्षप्रवेश सोहळ्याला विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, आमदार रामदास मसराम, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेसचे निरीक्षक संदेश सिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, पंकज गुड्डेवार, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सुरेश पोरेड्डीवार यांच्यासह त्यांच्या पत्नी माजी प्राचार्य कविता पोरेड्डीवार, माजी सभापती विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षलता येलमुले, लालसू नोगोटी, माजी नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “काँग्रेसने नेहमीच गोरगरिबांना अन्न, निवारा आणि सुरक्षा दिली. राज्यघटनेतील पाचव्या अनुसूचीद्वारे आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण केले. परंतु, आता याच जमिनी खाण व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्याचा घाट भाजपने घातला आहे.” सत्तेच्या काळात भाजपने बक्कळ पैसा जमवला असून, त्याच पैशाचा वापर करून ते सर्वकाही करत आहेत. “देशाच्या पंतप्रधानांना केवळ श्रीमंतांविषयी आपुलकी आहे, त्यांना गरिबांविषयी कोणताही कळवळा नाही,” असा टोलाही सपकाळ यांनी लगावला. याप्रसंगी माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, संध्या उईके, कविता बोबाटे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मनिषा खेवले, रामचंद्र वाढई यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार विजय वडेट्टीवार यांनीही आपल्या भाषणात भाजप, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. आमदार रामदास मसराम, आमदार अभिजित वंजारी, महेंद्र ब्राम्हणवाडे, तसेच नव्याने पक्षात आलेले सुरेश पोरेड्डीवार व विजय गोरडवार यांचीही यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सतीश विधाते यांनी केले.