नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपकडून आज देशात सामाजिक न्याय, शांतता आणि संविधानावर सातत्याने हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाच्या रक्षणासाठी आणि लोकजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्ता तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली आहे, असे मत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेचा उद्देश फक्त चालणे नव्हे, तर संविधान रक्षणाची चळवळ उभारणे आहे. देशमुख म्हणाले, ही यात्रा म्हणजे सामाजिक प्रश्नांची उकल करण्याचे माध्यम आहे. आज अनेक वर्गांना न्याय मिळत नाही, शांती ढळली आहे, आणि संविधानाची मूल्यं धोक्यात आली आहेत. अशा स्थितीत ही यात्रा जनतेला सजग करणारी आहे.
तुषार गांधी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक पक्षांचे नेते या यात्रेत सहभागी झाले असून, नागपूर ते सेवाग्राम या मार्गावरून ती पुढे सरकत आहे. आपण सर्वांनी मिळून संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक समतेसाठी आवाज उठवला पाहिजे, असेही देशमुख यांनी आवर्जून सांगितले.
‘हम भारत के लोग’ या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेला आज सकाळी वाजता नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीतून जल्लोषात सुरुवात झाली. ही पदयात्रा सेवाग्राम येथील बापू कुटीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी व गांधी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.
‘हम भारत के लोग’ या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेला आज सकाळी साडेसहा वाजता नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीतून जल्लोषात सुरुवात झाली. ही पदयात्रा सेवाग्राम येथील बापू कुटीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी व गांधी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.
पदयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, अवंतिका लेकुरवाळे, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, कुंदा राऊत यांचा सहभाग लक्षणीय होता.
‘हम भारत के लोग’ संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारीही पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेचा आरंभ ढोल-ताशांच्या गजरात व भजन मंडळींच्या भक्तिगीतांनी झाला. संपूर्ण मार्गात हरे राम हरे कृष्ण, देवकीनंदन गोपाला, “वोट चोर गद्दी छोड़”, “संविधान बचाओ”, “लोकशाही वाचवा”, अशा घोषणा देण्यात येत होत्या. या घोषणांमधून सरकारविरोधी भावना आणि संविधान रक्षणाबाबत जनजागृतीचा स्पष्ट संदेश दिला जात होता.
ही पदयात्रा नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू होऊन विविध गावांतून आणि शैक्षणिक संस्थांमधून जात सेवाग्रामच्या बापू कुटीत पोहोचणार आहे. बापूंच्या स्मृतींना वंदन करत संविधान, अहिंसा, समानता आणि न्याय या मूल्यांची पुनःप्रस्थापना करण्याचा उद्देश या यात्रेमागे आहे. ही पदयात्रा केवळ चालण्याचा कार्यक्रम नसून, ती एक वैचारिक चळवळ आहे. देशातील सध्याच्या राजकीय व सामाजिक वातावरणात नागरिकांमध्ये संविधान आणि लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही यात्रा समाजाला एक प्रेरणादायी दिशा देईल, असा विश्वास सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.