नागपूर : नथुराम गोडसेची औलाद बनून राहुल गांधींना गोळ्या घालण्याचे वक्तव्य केवळ लाजीरवाणे नाही, तर थेट लोकशाहीच्या हत्येचा इशारा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. भाजप नेत्याने दिलेल्या या धक्कादायक विधानानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, राहुल गांधी हे गरीब, शेतकरी, कामगार, ओबीसी, दलित, आदिवासी यांच्यासाठी संघर्ष करणारे नेते आहेत. अशा लोकशाहीतून निवडून आलेल्या नेत्याला गोळ्या घालण्याची भाषा करणे म्हणजे फक्त त्यांच्यावर नाही, तर संविधान, संसद आणि संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरच हल्ला आहे.
काँग्रेसने भाजप नेत्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर या वक्तव्यावर भाजपकडून कुठलीही कारवाई झाली नाही, तर हा पक्षाचा अधिकृत दृष्टिकोन समजला जाईल, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. हे वक्तव्य केवळ असंतुलित विचाराचे नाही, तर सत्ताधारी मानसिकतेचे वास्तवदर्शक उदाहरण आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
राजकीय विरोध मान्य आहे, पण विरोधकांविरोधात द्वेष, हिंसा आणि हत्या अशा टोकाच्या शब्दांचा वापर लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे. देशाच्या नागरिकांनीही अशा मानसिकतेचा स्पष्टपणे निषेध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाने भूमिका स्पष्ट करावी, अशीही काँग्रेसने मागणी केली आहे. काँग्रेसने या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला असून, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.
केरळमधील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी ही धमकी दिली आहे. एका टीव्हीवरील लाईव्ह चर्चेदरम्यान पिंटू महादेवन यांनी राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू असे धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर काँग्रेस पक्षाने तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे काँग्रेसने राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच, केरळमधील भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. लाईव्ह टेलिव्हिजनवर अशा प्रकारची धमकी देणे हा लोकशाही परंपरेचा अवमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.