नागपूर : काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार व नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन उत्तराखंडमधील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) त्यांची उत्तराखंडसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. या दौऱ्यात त्यांनी कोटद्वार, लैंसडाऊन आणि यमकेश्वर या विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठकांना आणि नागरिक संवाद कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

या संवादांतून स्थानिक जनतेने राष्ट्रीय महामार्गांच्या अत्यंत खराब स्थितीबाबत आणि दोन प्रमुख रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. लालढांग–चिल्लरखाल मार्ग व रामनगर–कांडी मार्ग या दोन्ही रस्त्यांचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण असून, त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर, आमदार ठाकरे यांनी थेट नितीन गडकरी यांची भेट घेऊन या समस्येवर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. त्यांनी दोन्ही रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करत, या प्रकल्पांवर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करावी, अशी विनंती केली. गडकरी यांनीही निवेदन गांभीर्याने घेतले असून संबंधित विभागांकडून माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

या भेटीत विकास ठाकरे यांनी सामान्य जनतेच्या समस्या थेट केंद्र सरकारपुढे मांडण्याची भूमिका घेतली असून, यामुळे उत्तराखंडमधील रस्ते प्रश्नांवर तोडगा निघण्याची आशा व्यक्त केली जात आहे. काँग्रेसने आपल्या संघटन सृजन अभियानांतर्गत जनतेच्या मुद्द्यांवर सक्रियपणे काम करत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले आहे.