अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसने गुरुवारी रात्री उशिरा  उमेदवारीची माळ साजिद खान पठाण यांच्या गळात टाकली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी उमेदवारी जाहीर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोल्यात लोकसभेसोबतच रिक्त असलेल्या अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा देखील बिगुल फुंगल्या गेला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेसाठी लोकसभेसोबतच दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी रात्री उशिरा आपला उमेदवार जाहीर केला. २०१९ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढणारे साजिद खान पठाण यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवून पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे. महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांना कडवी झुंज दिली होती. या निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांना ७३ हजार २६२, तर साजिद खान पठाण यांना ७० हजार ६६९ मते मिळाली होती. दोन हजार ५९३ मतांनी साजिद खान पठाण यांचा पराभव झाला होता. आता पठाण पोटनिवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरणार आहेत. अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे साजिद खान पठाण यांच्यावर दाखल आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nominated sajid khan pathan in the akola west by election akola ppd 88 amy