गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात आयोजित ‘युगप्रवर्तक हेडगेवार’ या नाटकाच्या प्रयोगावरून वाद निर्माण झाला असून विविध संघटनांनी हा नाट्यप्रयोग रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ३० जूनला विद्यापीठासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्यावतीने ३० जूनला ‘युग प्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या नाटकाचा प्रयोग विद्यापीठाच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. गोंडवाना विद्यापीठ ही संस्था शासनाचा निधी व विद्यार्थ्यांच्या शुल्कातून चालवण्यात येते. त्यामुळे या विद्यापीठात एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार-प्रसार करणे चुकीचे व बेकायदेशीर आहे. गोंडवाना विद्यापीठ हे विद्यार्थाच्या शैक्षणिक विकासासाठी सुरू करण्यात आलेले आहे. कोणत्या एका विचारसरणीच्या प्रचार-प्रसारासाठी नाही, असे या संघटनांनी कुलगुरूंना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डॉ. हेडगेवार यांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाशी अथवा देशातील दलीत, आदिवासी, अल्पसंख्याक समुदायाच्या कल्याणाशी कोणताही संबंध नाही. असे असताना डॉ. हेडगेवारांच्या जीवनावरील नाटक विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करणे पूर्णतः अनुचित तर आहेच परंतु बहुसंख्येने असलेल्या दलीत व आदिवासी विद्यार्थ्यांवर त्यांचा विचार बळजबरीने थोपवण्याचा हा प्रकार आहे. याचा आम्ही तिव्र निषेध करतो, असेही निवेदनात नमूद आहे. यामुळे गोंडवाना विद्यापीठ पुन्हा एकदा वादात सापडले आहे.

सदर नाट्यप्रयोगाला अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषदेचे कुणाल कावे, सुरज मडावी, बादल मडावी, रुपेश सलामे, खुशाल मरस्कोल्हे, आदिवासी एकता युवा समितीचे उमेश उईके, आदिवासी टायगर सेनेचे लीना कोकोडे, अमोल कुळमेथे, जंगो रायताड महिला संघटनेच्या आरती कोल्हे, विद्या दुगा, शारदा मडावी, वीर शहीद बाबूराव प्रबोधन समितीचे डॉ. वसंत कुलसंगे, कम्युनिष्ठ पार्टी ऑफ इंडियाचे देवराव चवळे, अखिल भारतीय रिपब्लीकन पक्षाचे हंसराज उंदिरवाडे, यांच्यासह विविध संघटना व राजकीय पक्षांचा विरोध आहे.