आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत सादर केलेला दावा आवश्यक कागदपत्रांच्या नावाखाली सरसकटपणे फेटाळणे हा अन्याय्य आणि अवैध निर्णय असल्याचे निरीक्षण नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नोंदवले आहे. आयोगाने बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स कंपनीला तक्रारकर्त्यास ३५ हजार ७५१ रुपये व्याजासह अदा करण्याचा आदेश दिला आहे. शांतीनगर येथील रहिवासी संजय तोटेवार यांनी ३० ऑक्टोबर २०२२ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीसाठी बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स कंपनी कडून आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण केले होते.
या पॉलिसीअंतर्गत त्यांना पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध होते. दरम्यान, तोटेवार यांच्या मुलाला आजारपण आले असता त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार केले. उपचारांनंतर त्यांनी कंपनीकडे ३९ हजार ५६८ रुपयांचा विमा दावा सादर केला. मात्र, कंपनीने “आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही” या कारणावरून दावा नामंजूर केला. कंपनीच्या या निर्णयाने संतप्त झालेल्या तोटेवार यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली. तक्रारीवर सुनावणीदरम्यान विमा कंपनीने आपले म्हणणे मांडत सर्व आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. तथापि, आयोगाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून आणि सादर पुरावे पाहून तक्रारकर्त्याच्या बाजूने निर्णय दिला.
आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी आणि सदस्य बाळकृष्ण चौधरी यांनी दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, विमा कंपनीने आवश्यक कागदपत्रांच्या अपूर्णतेचे कारण देत दावा नाकारण्याची पद्धत सरसकट आणि अनुचित आहे. अशा प्रकारे ग्राहकास अन्यायकारक वागणूक देणे हे ग्राहक संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन ठरते. आयोगाने विमा कंपनीला तोटेवार यांना ३५ हजार ७५१ रुपये रक्कम ९ टक्के वार्षिक व्याजासह २९ मार्च २०२३ पासून प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत देण्याचा आदेश दिला आहे. तसेच, ग्राहकाला झालेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबाबत तसेच तक्रार खर्चासाठी आयोगाने १५ हजार रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचेही निर्देश दिले आहेत. “विमा कंपनीने दाव्याचे परीक्षण करताना ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे अपेक्षित असते. दस्तऐवज सादर करण्यात किरकोळ त्रुटी असली तरी त्यावरून दावा पूर्णपणे फेटाळणे हा योग्य मार्ग नाही,” असे आयोगाने आपल्या निर्णयात नमूद केले. आयोगाने आरोग्य विमा दावा फेटाळणे अवैध ठरवला तसेच कंपनीला ३५,७५१ रुपये + ९% व्याज देण्याचा आदेश दिले. याशिवाय १५ हजार रुपये मानसिक त्रास व खर्चपोटी भरपाई देण्यासही सांगितले.
